हलकं-फुलकं – राजश्री वटे
फोन वाजला… अगं, माझ्या चुलत जावेच्या मावस बहिणीच्या मुलीचे लग्न ठरलंय, जरा शॉपींगला जायचं आहे, चल… काय गं सगळ्या साड्या नेसून झाल्या, नवीन हवं न्ं काहीतरी… दोघी मैत्रीणींनी स्वयंपाक बदडून ठेवला सकाळीच आणि निघाल्या शॉपिंगला ! सगळा बाजार पालथा घातला, शेवटी एका दुकानात हो नाही करत पडली एकदाची पसंत साडी, मग त्यावर ज्वेलरी, बांगड्या म्हणजे साडीचे इतर नातेवाईक गोळा करत पिशवीत कोंबले अन्् धापा टाकत संध्याकाळी दमून घर गाठलं (कुणाची म्हैस…असो)
लग्न घरी भेट… आस्थेने चौकशी (की चोंबडेपणा)
किती दागिने घालणार, कपडा कुठे घेतला, बजेट किती, कटरर कोण…चांभार चौकशा झाल्या ! मुलीची आई उत्साहाच्या भरात भडाभड बोलून मोकळी… मुलगी खुणा करतेय की, काही सांगायचे नाही तरी आईचे कुठे लक्ष… बोलतच आहे… बोलतच आहे… असे अनेक येतात, चौकशी करतात, आम्ही किती प्लानिंगने केलं परफेक्ट… वगैरे वगैरे !
लग्न येऊन ठेपतं… मांडववाला, केटरींग वाला, डोकं खातात ते वेगळं, ऐकतात एक करतात दूसरच…अन तो लेडीज टेलर… त्रास देऊ… निर्वीकार ! नवरी तर नवरी… तिची आईपण ४ दिवस आधीपासून पार्लरच्या फेऱ्या घालताहेत, त्याच्या १५ दिवस आधी फिटनेस मानिया त्यांच्या नाकात दम आणतो,दमून जातात बिचाऱ्या…नवऱ्या मुलाच्या आईची अवस्था याहून वेगळी नसते… फक्त इथे एक से दो भले असतात…!नवरी मुलीची आपल्या आईला सुचना… आईच्या मुलीला सुचना… काही सुचेना त्यांना… बेजार करून टाकतात एकमेकींना…!हळदीची सकाळ…सगळं सुर्यप्रकाशा इतकं पिवळं… कपड्यांपासून फुलांपर्यंत…जेवणापासून, आतापर्यंत पार्लरमध्ये केलेला फेशीयलचा ग्लोवर….प्रचंड खर्च वाटीभर हळदीत स्वाहा…पी हळद… हो गोरी…का पिवळी… कोणास ठाऊक…धिंगाणाच… धिंगाणा !
संगीत-मेहंदी… गाऊन थीम…गाणे वाजते… सुपारी फुटली…नवराई माझी… वेस्टर्न स्टाईल गाऊनला काष्टयची गाणी…इंडो वेस्टर्न म्हणे…! मेंहदीसाठी नंबर…तुझी केव्हढी… माझी केव्हढी…नवरीची तर हाताच्या नखापासून…ब्लाऊजच्या बाहीपर्यंत !(तीन दिवसांनी तिची उतरती कळा बघवत नाही)नवरा-नवरी बाजूलाच…
बाकी सगळे पोटाच्या घड्या सांभाळत…नाचता येइना… हं चालू द्या…
मायकल जॅकसन ते मिथून…सगळी झलक… हौस दुसरे काय !नवरीच्या आईला कोणीतरी शोध शोध शोधतात… समोर उभी पण…ओळखत नाही कोणी? नखशिखांत मेकओवर…अगं… आज तू मोठी बहीणच शोभतेस… झाले… काय विचारता मग…पोटाच्या घड्या वाढल्याच म्हणून समजा…मुठभर मांस… दुसरं काही नाही..!धुमशान स्टेज गाजतो!
स्टेजवर हातवारे करणारे घामाने निथळत जेवणावर आडवा हात मारतात…खाण्यात मीठ जरा जास्त झाले का असा प्रश्न स्वत:लाच विचारतात !लग्न घटीका…बँडवाले जिवाच्या आकांताने बँड पिटत असतात…आया पोराटोरांना तयार करून हातावेगळे केलेली ती पोरे तिथे येऊन नाचत असतात… एकदा मोठ्यांनी ताबा घेतला की, कुठे त्यांना स्कोप… नवरा चढला घोड्यावर… झालं… बँडवाले फार्मात… तिकडे फेटे बांधणाऱ्यांकडे झुम्बड… सर्व बापे रुबाबदार फेट्यांमध्ये बँड पुढे हाजीर…हल्ली बायकापण…!आज मेरे यार की शादी…तेनू काला चष्मा…अशा गाण्यांवर तुफान डान्स…झिंग झिंग झिंग झिंगाट…काही विचारूच नका गोंगाट !कुणी भांगडा करतय, कुणी,दान्डिया करतय… आधी नागीन डान्स फेमस होता,… आता मोर डान्स जोरावर आहे…नाच रे मोरा वर थरथराट…नागीन डान्स व मोर डान्सची जुगलबंदी तावात… पारंपरिक वेशातल्या तरुण तरुणींची काळ्या चष्म्या आडून… इशारो इशारोमे…
तरुणी इतका वेळ घालवून मेहनतीने केलेल्या मेकअपची जरा जास्तच काळजी घेत होत्या ! नाचनाचुनी अती मी दमले… अशा अवस्थेतल्या बायकांनी नाश्त्याकडे मोर्चा वळवला आत्मा शांत करायला!
हौस म्हणजे काय बघा…एका लग्नात बँडवर नाचत मांडवात झकास एण्ट्री घेते… काला चष्मा असतोच… हां ! आणखी एका लग्नातला किस्सा…नवरी पारंपरिक वेषात, काला चष्मा, फेटा लाऊन घोड्यावर गावभर फिरून हळदीसाठी मांडवात अवतरली…बया…बया…बया…!मग फोटो शुट…फोटोग्राफर कमाल…नवरा-नवरी धमाल…गुरुजी बोलावून थकले…शेवटी लागलं लग्न! नवरीच्या वजनापेक्षा वजनी घागरा, किमतीने पण भारीघालून थकली बिचारी दोन दिवसांपासून…होमाला हलक्या फुलक्या नऊवारीवर आली…कान पिळणीला, बूट लपवणीला, कवाड झाकणीला नवरदेवाच्या शेरवानीच्या खिशातील भरलेली पाकीटं बाहेर पडली… तिचे अन् त्याचे ओझे कमी झाले…संसाराचे ओझे संभाळायला ! दोघे लग्नाचे विधी करण्यात व्यस्त… थकून आळसावलेले ! बाकीच्या बायका जरा धावपळीनंतर विसावल्या होत्या… कोणाचे कसे, कोणाचे कोण, कोण कशी हे बघण्यात रमल्या. त्यांची बायको कुठेतरी रमली आहे, आज तिचा आपल्यामागे लकडा नाही म्हणून सुखात होते व आज तिच्या मेकअपमुळे ती लवकर ओळखायला येत नव्हती नवऱ्यांना… चुकून दुसरीजवळ जाण्यापेक्षा… नकोच ! सकाळचे बँडवर नाचणारे काळ्या चश्म्यातील तरुण-तरुणी आता डायरेक्ट…गॉगल काढून… जरा नजरोसे कह दो जी…पर्यंत आले होते ! त्यांना हे माहीत असते… कल हम कहां… तुम कहां… सगळे सोहळे आटोपले… जा… मुली… जा… झाले ! मुलीच्या आईने दमून हुश्श केले…मुलीचे वडीलही सगळे व्यवस्थित झाले म्हणत घाम टीपतो… तो फक्त हेच करत असतो… बिचारा ! लेकीचे लग्न ठरल्यापासून होईपर्यंत…
‘तुम्ही गप्प बसा हो, तुम्हाला काही समजत नाही’ हेच ऐकत असतो… बापाचे काळीज कोणाला कळणार…तो कधी थकत नाही, कधी रडत नाही…फक्त म्हणत राहतो…‘तू म्हणशील तसं…!