मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल गोळीबार झाला. वांद्रे पूर्व खेरवाडी परिसरात ही घटना घडली. या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला असून गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास बाबा सिद्धिकी यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले असून यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान मारिन लाईन येथे दफनविधी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात येणार आहे. त्यानंतर ८ वाजून ३० मिनिटांनी मुस्लिम समाजाच्या पध्दतीनुसार त्यांच्या पार्थिवचे दफनविधी होणार आहे. यावेळी राजकीय नेत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येण्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बाबा सिद्दिकींना १५ दिवसांपूर्वी धमकी
बाबा सिद्दिकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. परंतु काल झालेल्या गोळीबारादरम्यान पोलीस कर्मचारी कुठे होता आणि यावेळी नेमके काय घडले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.