प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
कोणत्याही वयात, कोणत्याही माणसाला, कोणताही पुरस्कार मिळाला तर त्याला आनंद होतोच! छोटे-मोठे पुरस्कार आयुष्यामध्ये खूप मोठा आनंद देऊन जातात. याशिवाय पुरस्कार मिळाल्यावर ज्या क्षेत्रात आपण काम करत असतो त्या क्षेत्रात अधिक उत्साहाने काम करण्याची उर्मी जागृत होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास निर्माण होतो.
प्रयोगशीलता वाढते म्हणजेच काहीतरी नवीन करून पाहावेसे वाटते. हे जसे पुरस्कार मिळाले त्याच्या बाबतीत घडते तसेच त्याच्या आसपास वावरणारी जी माणसे असतील. मग सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते असतील, संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे शिष्य असतील, एखाद्या आवडीच्या कलाकाराचे चाहते असतील वा नव्यानेच एखाद्या लेखक / कवीचे साहित्य वाचून भारावल्या स्थितीत साहित्यक्षेत्रात पदार्पण करणारा विद्यार्थी असेल म्हणजेच आपण चला फॉलो करतो. त्याला मिळालेले यश कधीतरी आपल्याही वाटेला येईल असे कुठेतरी या व्यक्तींनाही वाटत राहते आणि ते त्या दिशेने जोमाने कष्टप्रद वाटचाल सुरू करतात. याचाच अर्थ पुरस्कार अनेकांना प्रगतिपथावर चढण्यासाठी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष प्रोत्साहन देतात हे निश्चितच!
आता काही मी माझ्याच बाबतीत घडलेली उदाहरणे देऊन काही सांगू पाहते. मी एका संस्थेला माझे पुस्तक प्रकाशित झाल्यावर ‘पुरस्काराच्या विचारार्थ’ ते पाठवले. साधारण दोन महिन्यांनंतर, त्या संस्थेच्या अध्यक्षांचा मला फोन आला की, तुमचे पुस्तक वाचले. अगदी त्या पुस्तकातील कथांचे कथाबीज किती सशक्त आहे याविषयीचे वर्णनही माझ्यासमोर केले. आपले पुस्तक कोणीतरी मनापासून वाचल्याचे समाधान मला मिळाले. मग त्यांनी हळूच सांगितले की, तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. मला स्वाभाविकच खूप आनंद झाला. ते पुढे म्हणाले की, तुमच्यासोबत पुरस्कार मिळालेल्या सर्व लेखकांचे, आम्ही एक चकचकीत-गुळगुळीत पानांचे पुस्तक काढणार आहोत ज्यावर तुमचा फोटो असेल, तुमच्याविषयीची माहिती असेल आणि तुमच्या पुस्तकाविषयीची माहिती असेल. मी म्हटले की, हा तर फार मोठा सन्मान आहे तर ते म्हणाले की, हो ना… शिवाय ही माहिती वाचून कितीतरी संस्था तुम्हाला कार्यक्रम देतील, याशिवाय तुमची पुस्तके विकली जातील. मी त्यांचे आभार मानले. त्यावर ते हळू आवाजात म्हणाले की, पण या सर्व गोष्टींसाठी साधारण अडीच हजार रुपये लागतील! मी ताबडतोब सांगितले की, अप्रत्यक्षपणे तुम्ही मला पुरस्कार विकत घ्यायला सांगत आहात, तर मला तो नको. त्यानंतर पुरस्कार्थींचा एक व्हाॅट्सअॅप ग्रुप बनवला होता तेथून माझे नाव हटवले गेले, याचा मलाच आनंदच झाला. गंमत म्हणजे जेव्हा पुरस्कार मिळालेल्या लेखकांची बातमी छापून आली तेव्हा त्यातील नावे मी मुद्दाम वाचली आणि माझ्यासारखाच त्यांनाही फोन आला होता की काय, ते विचारले तर त्यातील सर्वांनी सांगितले की, असे सुंदर छोटेखानी पुस्तक बनवण्यासाठी पैसे लागतातच ना म्हणून आम्ही ते दिले. याचा अर्थ पैसे देणारे आहेत म्हणून घेणारे आहेत, म्हणजेच पैसे देऊन पुरस्कार घेणारे आहेत!
या उदाहरणांवरून मला एकच सांगायचे आहे की, कधी अशा तऱ्हेने छोटेखानी पुस्तक बनवायचे आहे. कधी कार्यक्रमाचा मोठा खर्च असतो, तर तो आपणच उचलावा अशी संस्थेची अपेक्षा असते. कधी पुरस्कार पाठवण्याच्या निवेदनामध्ये लिहिलेले नसते की, आपल्याला पुरस्कार मिळाल्यावर संस्थेचे सभासदत्व घ्यावे लागेल आणि मग पुरस्कार जाहीर झाल्याचे सांगून सभासदत्व घेण्यास सांगितले जाते. एखादा पुरस्कार देणाऱ्या संस्थेचाही प्रकाशन व्यवसाय असतो आणि मग ते पुरस्कारप्राप्त लेखकांना आपल्या प्रकाशनाची काही पुस्तके विकत घेण्यास सांगतात. पुरस्कारप्राप्त लेखकांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न करून त्या पैशाने संपूर्ण कार्यक्रम घडवून आणून शिवाय काही पैसा संस्थेसाठी उरवतातसुद्धा!
अशा संस्थांचे जेव्हा पुरस्कार जाहीर होतात तेव्हा त्यातील नावे पाहून आपल्याला त्या लेखकांची कीव येते आणि आपण त्यात नसल्याचा आनंद पुरस्कार मिळालेल्या लेखकांपेक्षा आतूनच जास्त प्रमाणात होतो!
असो! तर हे मी थोडक्यात सांगितले आहे.
पण जाता जाता आणखी एक संवाद मला आठवतोय. एका आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षांचा मला फोन होता. त्यांनी मला सांगितले की, तुम्हाला अकरा हजारांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासाठी आपण दहा हजार रुपये पाठवावेत! मी विचारले की, तुम्ही मला अकरा हजारांच्या ऐवजी एक हजाराचा पुरस्कार द्या ना! त्यावर त्यांनी आपला मोबाईल बहुधा जोरात आपटला असावा!
त्यामुळे पुरस्कार देणाऱ्यांनी-घेणाऱ्यांनी पुरस्काराच्या संदर्भात काय तो सुज्ञपणे विचार करावा, एवढे मात्र मी नक्कीच सांगेन! माझ्याकडे असा विकत घेतलेला एकही पुरस्कार नाही याचा मला अभिमान वाटतो!
आपले पुस्तक वाचून छोट्याशा खेडेगावातून कोणता तरी मिठाई विक्रेता, एखादा शाळेतील शिक्षक, गृहिणी किंवा कोणी साहित्यिक आपल्याला एखादी कविता किंवा कथा आवडल्याचा फोन करतो, माझ्या दृष्टीने तोच एक फार मोठा पुरस्कार असतो!
पहिले पाऊल टाकणारे मूल जेव्हा लडखडत असते, तेव्हा आई दोन्ही हात पुढे करून, त्याला तोल सावरताना, ‘मी आहे, तू उचल पाऊल!’ अशी ग्वाही देते आणि तेव्हा ते आत्मविश्वासाने दुसरे पाऊल टाकते. तेव्हा आई त्याला छातीशी घट्ट धरून एक छोटासा पापा घेते. मला वाटते हीच ती घट्ट मिठी आणि पापा, आपल्याला मिळालेला पहिला पुरस्कार असतो! अशा छोट्या- छोट्या निरागस पुरस्कारांची आयुष्यभर प्रत्येक माणसाला आस असतेच आणि तशी ती असायला काहीच हरकत नाही!