मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ. तारा भवाळकर या सहाव्या महिला अध्यक्षा आहेत. डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला तसेच नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे.
विशेष – लता गुठे
डॉ. तारा भवाळकर अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्त्व. व्यासंगी आणि अनेक साहित्य प्रकारात मुसाफिर केलेल्या ताराबाईंची पहिली भेट झाली ती… भरारी प्रकाशनच्या प्रकाशन सोहळ्यात. संत साहित्याच्या अभ्यासक रेखा नार्वेकर यांचे व माझे पुस्तक ताराबाईंच्या हस्ते प्रकाशित केले होते. त्या पुस्तक प्रकाशनासाठी आवर्जून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी केलेले भाषण ऐकून कान आणि मन तृप्त झाले. अतिशय साधी राहणी, यांच्या वाणीतील गोडवा आणि विदूषीचे चेहऱ्यावरील तेज यामुळे त्यांना एकदा जरी भेटले तरी कायम आपल्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या ताराबाई… दूरदर्शनच्या मुलाखतीमधून ताराबाईंना ऐकले तेव्हा लोकसंस्कृतीचा त्यांचा असलेला गाढा अभ्यास किती प्रचंड आहे ते लक्षात आले.
गेल्या वर्षी ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर येथे होते. या साहित्य संमेलनाच्या एक दिवस आधी धुळे येथे शुभम करोति साहित्य मंडळाच्या वतीने एकदिवसीय साहित्य संमेलन घेण्यात आले होते, या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणांमध्ये मी हा मुद्दा अतिशय स्पष्टपणे आणि पोटतिडिकीने मांडला होता की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये महिलांचा सहभाग अतिशय कमी आहे. ९७ पैकी फक्त पाचच लेखिकांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे. असे का? आपण समानतेचे ढोल पिटवतो; परंतु येथे कुठे गेली समानता? यावरून आपल्या लक्षात येईल की, किती प्रचंड प्रमाणात तफावत आहे.
लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी आली आणि सगळीकडे आनंदाची लाट उसळली. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककलांच्या अभ्यासक, स्त्री जाणिवांविषयी विपुल वैचारिक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यासाठी ताराबाईंचे प्रथम मनापासून अभिनंदन करते आणि यानिमित्ताने आपणास जरासे इतिहासात डोकावू इच्छिते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या १४६ वर्षांच्या इतिहासात अवघ्या सहा लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत महामंडळाने ९७ साहित्य संमेलने घेतली असून दिल्ली येथे होणारे हे ९८ वे साहित्य संमेलन आहे. महामंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी सुप्रसिद्ध लेखिका कुसुमावती देशपांडे या एकच स्त्री अध्यक्ष झालेल्या होत्या. महामंडळाच्या स्थापनेनंतर दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या चार स्त्रिया संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.
११ मे १८७८ रोजी पुण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ग्रंथकार संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात समजली जाते. त्यानंतर १९६० पर्यंत एकाही लेखिकेची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नव्हती.
१९६१ मध्ये ग्वाल्हेर येथे झालेल्या ४३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कथाकार कुसुमावती देशपांडे या निवडून आल्या. साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पहिल्या महिला संमेलनाध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर १९७५ मध्ये कराड येथे झालेल्या ५१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान दुर्गा भागवत यांना मिळाला. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या ६९व्या संमेलनाच्या अध्यक्ष होण्याचा मान शांता शेळके यांना मिळाला आणि इंदूर येथे २००१ मध्ये झालेल्या ७४ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विजया राजाध्यक्ष निवडून आल्या. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी २०१९ साली घेण्यात आलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आणि एक महिला संमेलनाध्यक्षपदी विराजमान झाल्या आणि त्यानंतर आता २०२४ साली ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष लोकसाहित्याच्या अभ्यासक तारा भवाळकर यांची निवड झाली. ही आम्हा लेखिकांसाठी अतिशय सन्मानाची गोष्ट वाटते. या सहा लेखिका वगळता अद्याप अन्य कोणत्याही लेखिकेला हा बहुमान मिळाला नाही. काही वर्षांपूर्वी कवियित्री आणि समिक्षिका प्रभा गणोरकर, मीना नेरुरकर, प्रतिमा इंगोले, गिरिजा किर आदींनी संमेलनाध्यक्ष निवडणुकीत सहभाग घेतला होता. पण त्यांना ही संधी मिळाली नाही. या सर्व लेखिकांनी आयुष्यभर मराठी साहित्यासाठी सकस साहित्य निर्माण करून मोलाचे योगदान दिले आहे याचा विसर निवड कमिटीला पडला असावा. असो सात दशकांनंतर दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी घोषणा केली. ऐन नवरात्रीत आदिशक्तीचा जागर सुरू असताना ८३ वर्षांच्या साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची सार्थ निवड झाली. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या सहाव्या महिला अध्यक्षा आहेत. डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला तसेच नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन यांविषयी तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे. तसेच लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलने यांत भाग घेतला आहे.
तारा भवाळकरांनी पौराणिक नाटकं, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्.मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. ताराबाईंनी केलेले हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशालाचे मराठीतले पहिले मराठी भाषांतर खूप गाजले आहे. ताराबाईंनी विद्यार्थीदशेतच नाट्य एकांकिका स्पर्धांसाठी लेखन, दिग्दर्शन व अभिनय केला. शिक्षण संपल्यावर त्यांनी स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून शाळा, कॉलेजच्या मुलांची नाटके बसवून दिली. याच दरम्यान त्यांनी एम.ए. केले आणि त्यानंतर त्यांनी नाटककार विष्णुदास भावे आणि मराठी पौराणिक नाटकाची जडण-घडण (प्रारंभ ते १९२०) हा प्रबंध लिहून पीएच.डी. मिळवली. त्यासाठी त्यांनी सांगली, केरळ, गोवा, कर्नाटक, कारवार, कोकणात जाऊन या विषयीची माहिती गोळा केली.
ताराबाईंच्या अष्टपैलू कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले… यामध्ये पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पुरस्कार, १९८२, बँक ऑफ बडोदा, सांगली : कृतज्ञता पुरस्कार, १९९०, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार लोकसंचित ग्रंथासाठी, १९९२, अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरववृत्ती, १९९४, मंगल पुरस्कार, कोल्हापूर विशेष कर्तृत्ववान स्त्रीसाठी साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी, १९९५, श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि अरस्वाद या ग्रंथासाठी, १९९६, वि. म. गोखले पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद या ग्रंथासाठी, १९९६, विशेष वाङ्मय पुरस्कार वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव माझिया जातीच्या या ग्रंथासाठी, १९९७., वाङ्मय समीक्षा प्रथम पुरस्कार, वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव.मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे या ग्रंथासाठी, १९९८.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जीवनगौरव पुरस्कार, २००६, लोकसंस्कृती, नाट्यसेवा पुरस्कार नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सांगली, २०१०, प्रियोळकर स्मृती पुरस्कार मुंबई विद्यापीठ २०१३. रत्नशारदा पुरस्कार सह्याद्री वाहिनी दूरदर्शन २०१५, गौरव पुरस्कार अ. भा. मराठी नाट्य परिषद, सांगली २०१७., डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील जीवन गौरव पुरस्कार अहमदनगर २०२१.अशा प्रकारे त्यांना मिळालेल्या सन्मानाची आणि पुरस्काराची यादी खूप मोठी आहे. ताराबाईंना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला यासाठी ताराबाईंचे पुन्हा एकदा अभिनंदन!
जाता जाता एवढीच इच्छा व्यक्त करते की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महिलांसाठी वेगळे असावे. यामुळे अनेक लेखिकांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. यातूनच लेखनाची प्रेरणा मिळेल.