सोलापूर : विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) बिगुल थोड्याच दिवसांत वाजणार आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) जागा वाटपाची आकडेवारी अजूनही गुलदस्त्यात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघापैकी (Assembly Constituency) अजित दादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला फक्त तीन जागा महायुतीतून सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माढा विधानसभा, करमाळा विधानसभा आणि मोहोळ विधानसभा या तीन जागांवर अजित दादांच्या शिलेदारांना संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात शरद पवारांची तुतारी लढणार आहे. पवार कुटुंबातील काका पुतण्याची लढाई सोलापूरच्या तीन विधानसभा मतदारसंघात होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजन पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार यशवंत माने असतील अशी घोषणा यापूर्वीच केली आहे. माढ्यातून बबनदादा शिंदें तीस वर्षांपासून आमदार आहेत,यंदा त्यांचे चिरंजीव रणजित शिंदें यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, तुतारी हातात घेतील आणि निवडणूकीच्या रिंगणात उतरतील, असे चित्र निर्माण झाले आहे. अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबीयांचा विरोध पाहून माढ्याच्या बबनदादांना तुतारी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.त्यामुळे रणजित शिंदे ऐवजी बबन दादा शिंदेंच माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या घड्याळ पक्षातून विधानसभा निवडणूक लढवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तर करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे अजित दादांच्या राष्ट्रवादी हे उमेदवार राहणार आहे, अशी माहिती देखील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.