मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्यावर काल संशयित आरोपींकडून गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगने (Lawrence Bishnoi Group) बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत जबाबदारी स्वीकारली असून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारानंतर देशभरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नाकाबंदी करण्याच्या सूचना
बाबा सिद्धीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर मलबार हिल परिसरातील मंत्र्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर देखील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्याच्या बंगल्याबाहेरही पोलीस तैनात केले आहेत. दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मलबार हिल परिसरातील महत्वाच्या पाँईंटवर नाकाबंदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सोशल मीडियाद्वारे लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर २८ तासांनी लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच सलमान खान आणि दाऊदला मदत करणाऱ्यांना सोडणार नाही, असे जबाबदारी घेताना त्यांनी म्हटले आहे.
Baba Siddiqui Murder : लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी!