भालचंद्र कुबल – पाचवा वेद
१९९०-९५च्या सुमारास अतुल पेठे यांनी पुणे महानगर पालिकेतील सफाई कामगारांवर तयार केलेली “कचराकोंडी” ही डाॅक्युमेंटरी बघितली आणि पुरता हादरून गेलो होतो. गटार, नालेसफाई कामगारांचे जळजळीत जीवनवास्तव याआधी कुणी कान पकडून पाहायला लावले नव्हते. त्या लघुपटाचा प्रभाव पुढे येत गेलेल्या याच आशयाच्या “पिवळा चिखल” या एकांकिकेतून आणि “अंधे जहाँ के अंधे रास्ते” या शिल्पा सावंत यांच्या नाट्याकृतीतून अधिक गडद झालेला असतानाच “गटार” समोर आले आणि सुन्न होणे काय असते हे, हा लेख लिहिण्यापर्यंत अनुभवतो आहे. आजवर अनेकदा वर्तमानपत्रातून गटार साफ करणाऱ्या कामगारांचे सफाई दरम्यान विषारी वायुमुळे घुसमटून मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. १९९३ साली भारत सरकारने ‘एम्प्लायमेंट आॅफ मेनहोल स्कॅवेंजर अँड कन्स्ट्रक्शन आॅफ ड्राय लॅटरिन प्रोव्हिजन अॅक्ट’ बनवून सुद्धा देशातील अनेक सफाई कामगारांच्या प्रत्यक्षपणे जीवाशी खेळणे सुरूच आहे. देशातील अनेक प्रगत महापालिकांपैकी मुंबई महानगरपालिका समजली जाते, तिथेही गटारे उघडी करून सफाई कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालताना उघड्या डोळ्यांनी पाहाण्यापलिकडे आपण काहीही करत नसतो. भारत सरकारने कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करण्याचे हक्क डिस्ट्रीक्ट कलेक्टरला देण्यातही आले मात्र १९९३ ते २०२० पर्यंत एकही केस देशभरात दाखल केली गेलेली नाही. २००८ मध्ये मद्रास हायकोर्टानेसुद्धा हाताने गटार सफाई न करण्याचा कायदा संमत केला पण आजवर त्याची अंमलबजावणी झाल्याचे ऐकिवात नाही. अशा कायद्याकडे दुर्लक्ष करत कंत्राटी कामगारांच्या वाट्याला आलेला उत्पन्नाचा मार्ग नाईलाज म्हणूनच स्विकारला जातो. चतुर्थ श्रेणी मनपा कामगारांच्या पिढ्या या कामात ओढल्या गेल्या आणि बरबाद झाल्या. हा आशय आणि याच हेतूने प्रेरीत होऊन वीरेंद्र गणवीर यांनी २०१८ साली ‘गटार’ या नावाने एकांकिका स्वरूपात ही कलाकृती प्रथम रंगमंचावर आणली. पुढे या एकांकिकेचा दीर्घांक करून अनेक स्पर्धांमधून यश मिळवत बहुजन रंगभूमीला ‘गटार’ या एकांकिकेच्या माध्यमातून एक आवाज प्राप्त झाला. वीरेंद्र गणवीर यांची नाटककार म्हणून अलौकिक प्रतिभा या दीर्घांकातून पावला पावलांवर दिसत राहते. झॅक देरिदाने ‘लोगोसेंट्रीझम’ म्हणजे ‘विवेकवादाची’ मांडणी केली आणि या विवेकवादाने प्रभावित झालेल्या ज्ञानसंस्कृतीमध्ये अनेक परस्परविरोधी द्वंद्वे (बायनरी अपोझिशन्स) निर्माण झाली. द्वंद्वे म्हणजे परस्पर विरोधी दोन पदे. पहिल्या पदाला पूर्ण प्रतिष्ठा व दुसरे पद प्रतिष्ठाविहीन अशी ही रचना, मालक आणि दास स्वरूपात समाजात दिसून येते. ही पदरचना काही नैसर्गिक नाही त्यामुळे ती विज्ञानाच्या आणि मानसशास्त्राच्या कसोटीला उतरत नाही. मग त्यास धर्माचे लेबल लावून चाललेले शोषण आपण पाहातोच आहोत. या सिस्टीमच्या विरोधात उभे ठाकण्याचे धैर्य वीरेंद्र गणवीर यांनी आपल्या ३०-३२ वर्षांच्या कालावधीत दाखवले आहे. आंबेडकरी चळवळीशी निगडीत असलेले त्यांचे लेखनकार्य विद्रोही आहे आणि ते जाती, धर्म, वर्ग, वर्ण, वंश, ईश्वर आणि अध्यात्म या विरोधात प्रखर भूमिका मांडते. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी मांडलेला ‘गटारीकरणाचा’ विचार अत्यंत दाहक सत्य सांगणारा आहे.
बाबा, अम्मा, गौतम, यादव आणि रवी या पात्रांना जणू अगोदरच्या पिढ्यांकडून गटार सफाईचा वारसाच लाभल्यामुळे त्यांचे गटारीकरण झाले आहे. मात्र रवीला ते मान्य नाही. रवी महाविद्यालयीन शिक्षण घेतोय आणि त्यातूनच स्वतंत्र बंडखोर विचार करायला तो सिद्ध झालाय. मात्र सिस्टीमच्या आहारी गेलेले त्याचे भवताल त्याच्या या बंडखोरीकडे दुर्लक्ष करून गटारीकरणाच्या गुंत्यात गुरफटले जातात. रवी शेवटी म्हणतो, “गटार ही या भारताची एक अशी सीमा आहे, जिथे हे लोक आपल्या भारत देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढतात” अशा साध्या सोप्या कथाबाजाचा हा दीर्घांक.
बदलण्याचा धगधगता निर्धार करणारा रवी हा या नाटकाचा नायक आहे. सफाई कामगारांच्या जीवनात असे असंख्य नायक निर्माण होण्याची आवश्यकता आहे. असे झाले तर केवळ नाटकातच नव्हे, तर सफाई कामगारांच्या प्रत्यक्ष जीवनातही गटारींची झाकणे बंद करणारी आंदोलने निर्माण होतील. सर्वसामान्य प्रेक्षक या नाटकात गुंततो कारण शेवटची पंधरा मिनिटं रवीने गटारात अडकलेल्या वडिलांना आणि त्यांच्या दोन साथीदारांना वाचविण्यासाठी केलेला संघर्ष. हे बचावकार्य इतके हुबेहुब वठलय की, त्याला दाद आल्यावाचून राहत नाही. गटारीकरणाच्या रात्रीचा अस्त घडवण्याचा निर्धार रवी बोलून आपले नाव सार्थकी लावण्याचा आशावाद समाजात पेरतो. या नोटवर जेव्हा हे नाटक संपते, तेव्हा आपण केवळ भारावलेल्या अंतःकरणाने आणि पाणावलेल्या डोळ्यांनी पूर्ण नटसंचाचे कौतुक करत असतो. अत्यंत सुविहीत अशा या गटारात छोट्या का होईना; परंतु खटकल्या त्या गोष्टींचा मुद्दाम उल्लेख करतोय. रवी एवढा पुरोगामी आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन चालणारे कुटुंब घराबाहेर तुळशी वृंदावन का पूजते? तसेच लेखक एक कुणीतरी शैली देशपांडे आपल्या पी.एच.डी. साठी माहिती गोळा करायला आल्यामुळे सफाई कामगारांच्या जीवनमानाची इन्फो प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. ही इन्फो पोहोचवण्याचा डिव्हाईस म्हणजे शैली देशपांडे. ती रवीशी बोलते, अम्मी-बाबांना प्रश्न विचारून भांबावून सोडते आणि त्यातून प्रेक्षकांना त्यांचे जीवनमान कळते. मग मला प्रश्न पडतो तो हाच की, किती काळ असले कथावस्तूला बाधा आणणारे हे डिव्हाईस आजच्या पिढीचे नवे लेखक वापरणार आहेत? त्यातही ती आनी-पानी करणारी शैली देशपांडे म्हटल्यावर थोडे आश्चर्यच वाटते. असो…
अशा काही दोन तीन खटकणाऱ्या गोष्टी सोडल्या तर गटार एक थरार आहे. नागपूरचा हा संघ मुंबईत पुन्हा येईल… तेव्हा जरुर बघा..!