नवरात्रोत्सवात गरबा खेळताना चक्कर आली, अन्…
रत्नागिरी : प्रत्येकाचे काहीना काही मोठं करायचे स्वप्न असते. मात्र स्वप्नाच्या पुढे नियती तिचा कोणता खेळ मांडेल हे कोणालाही ठाऊक नसते. अशीच एक घटना कोकनातील रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील सर्वात हुशार आणि प्रत्येक गोष्टीत प्रथम स्थानी असणाऱ्या वैष्णवी प्रकाश माने (१६) या विद्यार्थिनीला गरबा खेळताना चक्कर आली आणि यामध्ये तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ऐन सणासुदीच्या काळात दुर्दैवी घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून वैष्णवीच्या कुटुंबावरही दु:खाचे डोंगर पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसारा, वैष्णवी माने हिचा नवरात्रोत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. सरस्वती पूजनावेळी सुरू असलेल्या गरबा कार्यक्रमात ही दुर्दैवी घटना घडली.
निष्ठूर नियतीच्या खेळामुळे स्वप्न अधुरं
रत्नागिरीमधील आजीवली हायस्कूल मध्ये तिने ८६ टक्के गुण मिळवून तिने पहिला क्रमांक पटकवला होता. इंजिनिअरिंग करण्याचे वैष्णवीचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. दहावीमध्ये उत्तम मार्क मिळाल्यानंतर तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अॅडमिशनही मिळाले होते. मात्र आई-वडिलांची आठवण येत असल्याने तिने अॅडमिशन मिळालेलं हायस्कूल सोडून पुन्हा पाचल येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. हायस्कूलप्रमाणे या महाविद्यालयातही वैष्णवीने अभ्यासातील गुणवत्ता, उत्तम वक्तृत्व शैली, खेळातील आवड यामुळे शाळेतील गुरुजनांची मन जिंकली होती. मात्र वैष्णवी हिला गरबा खेळताना चक्कर आली आणि ती तिचा यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे वैष्णवीचे लहानपणीचे स्वप्न भंग झाले, अशी माहिती वैष्णवीच्या शिक्षकांनी दिली.
वैष्णवीचा शिक्षणासाठीचा प्रवास
राजापूर पाचल येथील महाविद्यालयात शिकणारी वैष्णवी ही आजीवली या आपल्या गावातून धनगर वाडीतून तब्बल दोन किलोमीटर पायपीट करून एसटी स्टॉपपर्यंत रोज येत होती. नंतर त्यापुढे दररोज एक तास एसटीने प्रवास करून पाचल येथे हायस्कूलमध्ये जात होती. या घटनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.