Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीबाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून शिवसेना केली मुक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून शिवसेना केली मुक्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दसरा मेळाव्यात घणाघाती टीका

मुंबई : मी बाळासाहेबांचा चेला, आनंद दिघेंचा शिष्य आहे. मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे. गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडके सरकार झाले आहे. लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडके सरकार झाले आहे. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता. आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र नंबर वन आणले. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून आपण शिवसेना मुक्त केली. त्यामुळे हा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उबाठा शिवसेना अध्यक्षांवर घणाघाती टीका केली.

आझाद मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कारभाराचा पंचनामा करताना महाआघाडीवर टीका केली.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही गर्जना करून बाळासाहेब सुरुवात करायचे. तेव्हा माझ्यासकट सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. ही आठवण सर्वांना आहे. गर्व से कहो हम हिंदू है ही सिंह गर्जना बाळासाहेबांनी देशाला दिली. पण काही लोकांना या शब्दाची अलर्जी झाली आहे. हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिंदूहृदयसम्राट म्हणताना काही लोकांची जीभ कचरू लागली आहे. पण आपल्याला हा शब्द उच्चारायला अभिमान वाटतो. पण हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना लाज वाटत आहे, अशी तडाखेबाज सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याची केली.

लपून बसणारा मुख्यमंत्री नाही

लपून बसणारा हा मुख्यमंत्री नाही. तर लोकांच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब म्हणाले होते, अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला, तेव्हा आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केला नसता तर शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले असते. सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता. महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. महाविकास आघाडी असताना सरकार तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्यात आपले राज्य पहिल्या नंबरवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

मी स्वस्तात जाणार नाही

चारही बाजूने लोक येत आहेत. शेवटच्या टोकापर्यंत हा महासागर पसरला आहे. भगवा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते हे सरकार १५ दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरुन उरला आणि जनतेच्या आशीर्वादाने साथीने घासून नाही घासून पुसून नाही, ठासून दोन वर्ष पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -