Sunday, January 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखनवी मुंबई विमानतळ, लवकरचा मुहूर्त शोधा.....

नवी मुंबई विमानतळ, लवकरचा मुहूर्त शोधा…..

नवी मुंबई विमानतळ हे राज्यातील एक बहुचर्चित विमानतळ आहे. कधी भू-संपादनावरून तर कधी विमानाच्या नावावरून झालेले आंदोलन यामुळे विमानतळ नेहमीच चर्चेत राहिले आहे. नवी मुंबई शहराची ज्या प्रकारे शासकीय गरजेतून निर्मिती झाली, त्याप्रकारे मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येचा लोंढा पाहता या ठिकाणी लोकसंख्येचा स्फोट होऊ नये यासाठी मुंबई शहरालगतच या लोकसंख्येचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातूनच नवी मुंबई शहर अस्तित्वात आले. ते सिडकोकडून विकसित करण्यात आले. नवी मुंबई शहर हे खाडीकिनाऱ्यालगत तसेच काही प्रमाणात खाडीअंतर्गत भागातही वसविण्यात आले आहे. नवी मुंबई विमानतळाची निर्मितीदेखील शासकीय गरजेतूनच झालेली आहे. मुंबईतील विमानतळावर विमानांची वाढती गर्दी, या विमानतळावर उतरण्यासाठी विमानांना अवकाशात माराव्या लागणाऱ्या घिरट्या यामुळे मुंबई शहरानजीकच नव्याने विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील विमानतळांवर विमाने उतरविण्यासाठी अवकाशातच विमानांची वाहतूक कोंडी होऊ लागल्याने वेळेचा व इंधनाचा अपव्यय होऊ लागला. समस्येचे गांभीर्य वाढत गेल्याने व विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानांना आकाशातच बराच वेळ घिरट्या मारण्याची वेळ आल्याने केंद्र सरकारला नवी मुंबई विमानतळाचा निर्णय घ्यावा लागला. अर्थात त्यासाठी पनवेल तालुक्यात खारघर, उलवेनजीक सरकारला भू-संपादन करावे लागले. नवी मुंबईत साडेबारा टक्के योजना राबविलेली असताना येथील भू-संपादनात फारसे अडथळे येऊ नये यासाठी सुरुवातीलाच साडेबावीस टक्के योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या विमानतळासाठी निसर्गाला पर्यायाने पर्यावरण सौंदर्याला मोठ्या प्रमाणावर तडजोड करावी लागली. डोंगर, टेकड्या हटवाव्या लागल्या. गाढी नदीच्या पात्राचा प्रवाह बदलावा लागला. यामुळे केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यावरण विभागाच्या नाराजीचाही अडथळा काही काळ नवी मुंबई विमानतळाला सहन करावा लागला. या विमानतळाच्या कामाला २०१८ मध्ये सुरुवात झाली असून २०२२च्या अखेरपर्यंत विमानतळावरून विमानांचे उड्डाण अपेक्षित होते; परंतु भू-संपादन डोंगर, टेकड्यांचा अडथळा हटविण्यास झालेला विलंब, गाढी नदीच्या पात्रातील बदल तसेच कोरोना महामारी, केंद्रीय मंत्रालयातील पर्यावरण विभागाचे अडथळे यामुळे येथील विमानतळावरून विमान उडण्यास विलंब झाला. या प्रकल्पाची भौतिक आणि आर्थिक प्रगती ५५-६०% पर्यंत पूर्ण झाली आहे.

या प्रकल्पाची सुरुवात २०१८ मध्ये झाली असून ३१ मार्च २००५ पर्यंत व्यावसायिक कार्यान्वयन सुरू होणे अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे एक धावपट्टी, एक टर्मिनल आणि दोन कोटी प्रवासी क्षमता निर्माण केली जाईल. प्रकल्पाच्या ३, ४ आणि ५ टप्प्यांत नऊ कोटींपर्यंतच्या वाढीव प्रवासी क्षमतेसह दुसरी धावपट्टी आणि चार टर्मिनल तयार केले जाणार आहेत. त्यानंतर विमानतळाच्या नावावरून गोंधळ झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा महाविकास आघाडीच्या काळात निर्णय घेण्यात आला. स्थानिक जनतेला हे नाव मान्य नव्हते. प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यानी लढा उभारला, ज्या नेतृत्वामुळे नवी मुंबई पट्टीत साडेबारा टक्के योजना राज्य सरकारला राबवावी लागली, त्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी स्थानिक जनता रस्त्यावर उतरली, जनआंदोलनेही झाली. अखेरीला महायुती सरकारला नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घ्यावा लागला. अर्थांत कोकणचे सुपुत्र व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंतुले यांचे नाव देण्याची मागणी मधल्या काळात एमआयएमनेही उचलून धरली; परंतु या मागणीची जनसामान्यांमध्ये तसेच प्रशासन दरबारीही फारशी दखल न घेतली गेल्याने या नावाची मागणी एमआयएमपुरतीच सीमित राहिली.

नव्याने होणाऱ्या नवी मुंबई विमानतळासाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची शुक्रवारी यशस्वी चाचणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वायुदलाचे सी-२९५ या विमानाने यशस्वी लँडिंग केले आणि उपस्थित असलेल्या नवी मुंबई व पनवेलमधील रहिवाशांनी एकच जल्लोष साजरा केला. विमानाचे लँडिंग होताच विमानावर पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही विमानात बसण्याचा मोह आवरता आला नाही. नवी मुंबई विमानतळावरून लवकरच देशांतर्गत विमान वाहतूक सेवा सुरू होणार असल्याने या विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. या विमानतळाच्या धावपट्टीवरून पहिले उड्डाण घेण्याचा मान भारतीय वायुदलाच्या सी-२९५ या विमानाला मिळाला. २०२५ पर्यंत नवी मुंबईचे हे विमातळ सुरू होईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहावेत यासाठी महायुतीच्या नेत्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले; परंतु पंतप्रधान मोदी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परदेशात असल्याने महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पुढच्या काही महिन्यांत या धावपट्टीवर अनेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत, त्यानंतर प्रत्यक्षात विमान उड्डाणाला परवानगी दिली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरून दर वर्षी अंदाजे ९ कोटी प्रवासी प्रवास करतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा शिवडी न्हावा-शेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो, दोन खाडी मार्गाने जोडला जात असून तो देशातील एक विशेष प्रकल्प ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या सुखोई फायटर विमानाचे यशस्वी टेस्ट लँडिंग झाले, विमानतळाच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता नवी मुंबईकरांना हे विमानतळ कधी सुरू होणार, याची उत्सुकता लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -