टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
जुई भागवत या नवोदित अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांवर उमटविला आहे. मालिकेत अभिनयाची बाजी मारल्यानंतर आता ती चित्रपटात अभिनयाचा सारीपाट खेळण्यास आली आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब ‘ या तिच्या पहिल्या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.कलाकारांच्या घरी कलाकार जन्माला येतो म्हणतात, ते खरे आहे. अभिनेत्री दिप्ती भागवत व संगीत संयोजक मकरंद भागवत यांच्या घरी जुई भागवत या कलाकाराने जन्म घेतला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीनुसार जुईचे अभिनयाचे गुण बालपणापासून तिच्या पालकांना दिसले होते.
माहीमच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून तिचे शालेय शिक्षण झाले. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात तिने भाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धेत ती मोठ्या उत्साहाने भाग घ्यायची. विज्ञान प्रदर्शनातील पी. पी. टी.चे सादरीकरण देखील तिने चांगल्याप्रकारे केले होते. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढतच गेला. स्टेज फियर नाहीसे झाले. त्यामुळे आज ती कॅमेऱ्यासमोर बिनधास्त वावरत असते. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी शाळेचा व शिक्षकांचा पाठिंबा तिला वेळोवेळी मिळत गेला. याबद्दल ती शाळेचे व शिक्षकांचे सदैव ऋणी राहणे पसंत करते.
तिने कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तिची आई अभिनेत्री असल्याने तिचे सेटवर वारंवार जाणे होतच असे. असेच एकदा ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेच्या सेटवर असताना तिच्या मनामध्ये मालिकेमध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली. तिने दिग्दर्शकाला सांगितले की, तिची ऑडिशन घेऊन तिला एखादी भूमिका द्यावी. तिची ऑडिशन घेतली गेली व तिची निवड लहानपणीच्या येशुबाईसाठी झाली. अशा तऱ्हेने तिचे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण झाले. बालकलाकार म्हणून नंतर तिने काही मालिका केल्या, त्यामध्ये खेळ मांडियेला, कुलवधू या मालिकांचा समावेश होता.
तिने साठे कॉलेजमध्ये दोन वर्षे थिएटर केले. नंतर रुईया कॉलेजच्या नाट्यवलय ग्रुपमधून तिने एकांकिका केल्या. इंग्रजी साहित्यामधून तिने पदवीपर्यंतचे शिक्षण तेथे पूर्ण केले. ती रुईया कॉलेजमध्ये होती, तेव्हा झी मराठी वाहिनीचा ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा रिॲलिटी शो आला होता. अभिनेते व दिग्दर्शक मकरंद देशपांडे, संजय जाधव होते. तिथे तिची निवड झाली, फायनलपर्यंत ती पोहोचली होती. मोस्ट एक्सप्रेसीव्ह फेसचे अवॉर्ड देखील तिला मिळाले होते. त्यानंतर तिने सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ ही मालिका केली. अभिनेत्री मधुरा वेलणकरच्या मुलीची भूमिका तिने केली. तिने साकारलेली सावनी व्यक्तिरेखा खूप गाजली. लोक आज देखील तिला भेटल्यावर ‘साऊ’ या नावाने हाक मारतात. एका फॅनने तर तिला लांबलचक पत्रच लिहिले होते. तिच्या इंटरव्ह्यूपासून मालिकेतील प्रत्येक एपिसोडमध्ये त्याला काय आवडले हे त्याने त्या पत्रात लिहिले होते. एक वेगळाच सामाजिक संदेश देणारी मालिका होती. जुईने तरुण पिढीचे प्रतिनिधित्व केले होते. व्यसनाच्या आहारी न कळत जाण्याचा मोठा धोका त्यांच्यापुढे होता. सावनी पुढे ड्रग्सच्या आहारी जाते व नकळतपणे ड्रग्सच्या रॅकेटमध्ये अडकते. शेवटी तिची आई तिला त्यातून कशी सोडविते हे मालिकेमध्ये पाहायला मिळाले.
पुढे तिच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला, तिला ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटामध्ये खुशी या ब्लॉगर मुलीची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. सोशल मीडियावर ती व्लॅाग अपलोड करीत असते.तिच्या सबस्क्राइबर्सना ती आयुष्यातल्या सर्व गोष्टी सांगत असते, दाखवत असते. एकदा तिने एका डेड बॉडीसोबत व्लॅाग बनविला. मग काय घडत, स्कॅम होत, कोण करतंय हे सारं या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटामध्ये अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे यांच्यासोबत तिला काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला तिला त्यांच्यासोबत काम करताना दडपण आले होते; परंतु अमेय वाघ, अमृताला भेटल्यावर तिचे दडपण निघून गेले. अमेय वाघ व अमृता खानविलकर दोघेही खूप व्यावसायिक आहेत. सेटवर अमेयला लागले तरी त्याचा बाऊ न करता तो लगेच शूटिंगला तयार असायचा. अमृता खानविलकर नेहमी सेटवर वेळेत यायची, तिच्याकडून वेळेचे महत्त्व जुई शिकली.
या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक हे हुशार असून ते कमालीचे लेखक असल्याचे जुईने सांगितले. पुढे ती म्हणाली की, या चित्रपटाच्या कथानकाचा विषय वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेची बॅक स्टोरी आहे. चित्रपटात घडतंय म्हणून काही घडत नाही, तर प्रत्येकाची काही तरी प्रेरणा (मोटिव) आहे. कथेची मांडणी खूप चांगली केली आहे, त्यामुळे दिग्दर्शन करताना ते क्लिअर होते. लेखक व दिग्दर्शक एकच असणं असे खूप कमी वेळा पाहायला मिळते. दिग्दर्शकाने कलाकारांना ती व्यक्तिरेखा साकारताना स्वातंत्र्य दिले होते, त्यामुळे प्रत्येक कलाकार त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करून त्यांचे विचार दिग्दर्शकांशी शेअर करीत होता.
हा चित्रपट सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री आहे, त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट दोनदा पाहतील असा आशावाद जुईने व्यक्त केला. परेश मोकाशी या दिग्दर्शकासोबत काम करण्याची तिची इच्छा आहे. ती छान गाते, तिचा कोकणकन्या नावाचा बँड (Band)आहे, त्यामुळे संगीतप्रधान भूमिका साकारण्याची सुद्धा तिची इच्छा आहे. ती कथ्थक शिकतेय. तिला अभिनय करायला आवडते. नृत्य, वाचन, ट्रेकिंग हे तिचे छंद आहेत. जुईला तिच्या पहिल्या ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा !