Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी बुमराह उपकर्णधार, संघात नव्या चेहऱ्यांना संधी

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी बुमराह उपकर्णधार, संघात नव्या चेहऱ्यांना संधी

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) प्रमोशन देऊन उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर या निर्णयाची घोषणा केली. रोहित शर्मा कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. हा निर्णय बुमराहच्या नेतृत्व कौशल्यावरील विश्वासाचे प्रतिक असून तो या मालिकेत अनुभवाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघात अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल आणि सर्फराज खान यांच्यावर अपेक्षांचे ओझे असेल, तर कोहली, अश्विन, जडेजा यांच्यासारखे अनुभवी खेळाडू संघात आहेत. याशिवाय पंत आणि जुरेल यांच्यासारखे दोन विकेटकीपरही संघात असून, खेळाडूंच्या विविधतेमुळे भारताला सामन्यांतल्या परिस्थितीनुसार बदल करता येईल.

कसोटी मालिकेचे आयोजन १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. पहिला सामना बंगळुरु येथे होईल, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे पुण्यातील गहुंजे स्टेडियम आणि मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात बुमराह आणि सिराज यांच्या नेतृत्वात वेगवान गोलंदाजीचा प्रभाव दिसू शकतो.

दुसरीकडे न्यूझीलंड संघानेही १७ सदस्यीय संघ जाहीर केला असून, टीम साऊथीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर टॉम लॅथमला पूर्णवेळ कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. श्रीलंका दौऱ्यातील पराभवानंतर न्यूझीलंडला पुनरागमन करण्याची संधी आहे. लॅथमच्या नेतृत्वात न्यूझीलंड भारतीय खेळपट्ट्यांवरील आव्हान पेलू शकतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना : १६-२० ऑक्टोबर, बंगळुरु
  • दुसरा सामना : २४-२८ ऑक्टोबर, पुणे
  • तिसरा सामना : १-५ नोव्हेंबर, मुंबई

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

न्यूझीलंडचा संघ : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स, इश सोढी, टीम साऊथी, केन विलियमसन आणि विल यंग.

Comments
Add Comment