बीड : आज दसरा सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तर राजकीय वर्तुळामध्येसुद्धा दसरा मेळावे दणक्यात सुरु आहेत. आज अनेक राज्यामध्ये प्रमुख नेत्यांनी दसरा मेळावा आयोजित केला आहे. मराठवाड्यामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. बीडमध्ये भगवानबाबा भक्त गडावर मुंडे परिवाराचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडत आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडमध्ये ही दसरा मेळाव्याची परंपरा सुरु आहे. त्यानंतर आता भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे या वारसा चालवत आहेत. मागील सात वर्षांपासून भगवान बाबा भक्ती गडावर पंकजा मुंडे या दसरा मेळावा घेत आहेत. यंदाचे वैशिष्ट्य असे की, पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे हे दोघे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले आहेत. तब्बल १२ वर्षांनी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे भावंड दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले आहे. मुंडेंच्या या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातून लक्ष लागून आहे. यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे कोणावर नक्की लक्ष्य करणार? तसेच आरक्षणावर देखील काय बोलणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील मुंडे परिवाराकडून कोणाला संधी दिली जाते या सर्व बाबींवर दसरा मेळाव्यामध्ये भाष्य करण्याची शक्यता आहे.