भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील दीक्षाभूमी येथे आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. तेव्हा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशात बौद्ध धम्माचे चक्र गतिमान केले. त्यानंतर दरवर्षी बौद्ध बांधव हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा करतात. त्यामुळे १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस अत्याचार आणि अन्यायावरील विजयाचे प्रतीक म्हणून मानले जाते. म्हणजे हजारो वर्षांच्या रूढी परंपरांच्या जुलमी बेड्या तोडून शारीरिक, मानसिक गुलामगिरीतून मुक्ततेचा आजचा दिवस.
रवींद्र तांबे
दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यामध्ये फरक जरी असला तरी बऱ्याच वेळा एका दिवशी विविध कार्यक्रमांनी साजरे केले जातात. अशोक विजयादशमी दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. तेव्हा बौद्ध बांधवांच्या दृष्टीने हा दिवस अतिशय आनंदाचा असतो. त्यामुळे बौद्ध बांधव दरवर्षी नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी देश-विदेशातून येतात. दीक्षाभूमी म्हणजे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने दलित शोषित समाजाला माणूस म्हणून जगण्याचे खरे स्वातंत्र्य दिले. अन्यथा काय अवस्था झाली असती मागास समजल्या जाणाऱ्या समाजाची. आजही खेडोपाडी जा तेथील दलित वस्तीत गेल्यावर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल किती परिवर्तन झाले. आजही दसऱ्या दिवशी शाळेत प्रसाद बनविण्यासाठी दलित महिलेला विरोध करतात, हे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. तसेच गावातील मराठी शाळेत ज्यावेळी शिक्षकाची नियुक्ती होते तेव्हा त्या गावचे ग्रामस्त तो शिक्षक ज्या जातीचा असेल त्या वस्तीत त्यांची राहण्याची सोय करतात. म्हणजे अजूनही मनातून जात जात नाही असे म्हणावे लागेल. मग सांगा त्यावेळी काय भयानक परिस्थिती असेल. हे परिवर्तन होणे आवश्यक आहे तरच खऱ्या अर्थाने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केल्यासारखा होईल. तेव्हा अजून किती वर्षे लागतील हे सांगणे कठीण आहे. मात्र जो दलित समाज गटातटात विखुरला गेला आहे किंवा जात आहे त्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. केवळ जयंतीपुरती एकी नंतर बेकी नको. काही मंडळे तर जयंतीच्या नावाखाली वर्गणी गोळा करायची नंतर हिशोब दाखवायचा नाही असेही उद्योग पाहायला मिळतात. तेव्हा ज्या ठिकाणी पैशांचा व्यवहार आला त्याचे कायदेशीररीत्या हिशोब तपासणीसाकडून तपासून घेतले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने परिवर्तन होईल.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा केला मात्र अजूनही दलित समाज स्वातंत्र झालेला नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे देशातील जातीयता होय. तेव्हा देशात धर्मांतर जरी झाले तरी अजूनही परिवर्तन झालेले दिसून येत नाही. हेच बाबासाहेबांनी ओळखून १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवले मुक्कामी झालेल्या परिषदेत घोषणा केली की ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.’ पुढे बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात, हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा आम्हाला लागलेला हा डागच आमच्या प्रगतीच्या आड येत आहे. आमच्या साऱ्या मानहानीचे, सवर्ण हिंदूंच्या आमच्या बाबतीत तुच्छतापर वर्तनाचे तेच एक कारण आहे.
असे जर आहे, तर त्या धर्माच्या नावाचा केवळ शिक्का घेऊन बसण्यात काय अर्थ आहे? ज्याप्रमाणे आम्हाला मनुष्याच्या मोलाने राहता येण्यात सुद्धा मज्जाव केला जात आहे, त्या हिंदू धर्माच्या कलशाचा एक भाग होऊन आम्ही का म्हणून आयुष्य घालवावे? अशा स्थितीत राहण्यापेक्षा या धर्मातून बाहेर पडून दुसऱ्या एखाद्या धर्माचा, ज्यामध्ये आपल्याला आज ही मानखंडना सहन करण्याचा प्रसंग येणार नाही, हलक्या, नीच दर्जाने वावरण्याची सवय होणार नाही, त्या धर्माचा अंगीकार करणे उचितच नाही का? अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारावयाचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेची हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा. दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि, हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हिंदू म्हणवून घेत मी मारणार नाही. म्हणजे यावरून बाबासाहेबांची दूरदृष्टी काय होती हे सहज लक्षात येते. तेव्हा या वाक्याचे आकलन बाबासाहेबांच्या अनुयायांनी करणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. कारण आंबेडकरी समाज हा आपापसात वादविवाद करीत असताना दिसत आहे.
तेव्हा आज ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करीत असताना बाबासाहेब समजून घेणे आवश्यक आहे. जर आपण बाबासाहेब समजून घेतले तरच आपल्यामध्ये परिवर्तन होईल. अन्यथा आपला उद्धार होणार नाही. बाबासाहेबांनी आपले आयुष्य दलितांच्या उद्धारासाठी वेचले. याचे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करून बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गाने चालले पाहिजे. दीक्षाभूमीच्या परिसरात पार्किंगचे चालू झालेले काम एकजुटीने बंद पाडले तसे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी एकजूट दाखवली पाहिजे म्हणजे दलित वस्तीतील बाकडी नजर अन्य ठिकाणी जाणार नाही. त्यासाठी शिक्षण घेऊन उच्चविभूषित झाले पाहिजे.
३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात ‘अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल.’ यावरून बौद्ध धर्माविषयी बाबासाहेबांची दूरदृष्टी सहज लक्षात येते. त्यासाठी त्यांनी २१ वर्षे विविध धर्मांचा अभ्यास करून १४ ऑक्टोबर १९५६ रोजी ती प्रत्यक्षात अमलात आणली. तेव्हा आज येतो गंध भिमाच्या दीक्षाभूमीच्या मातीला, या मातीने उद्धरिले साऱ्या मानवजातीला. ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशातील सर्व बौद्ध बंधू-भगिनींना मंगलमय हार्दिक शुभेच्छा!