भारताने जगाला बुद्धिबळाची देगणी दिली. या देशाने अनेक ग्रँडमास्टर घडवले. ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद तर चाहत्यांचा आदर्शच बनला आहे. बुद्धिबळाच्या याच खेळात भारताने परवा इतिहास घडवला. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी करत एकाच स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. अशी कामगिरी करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसराच देश ठरला.
श्रीशा वागळे
पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकनंतर आता बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय खेळाडूंनी ‘न भूतो न भविष्यती’ अशी कामगिरी केली आहे. भारताच्या बुद्धिबळपटूंनी सुवर्णमयी कामगिरी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. बुद्धिबळ जगतात अत्यंत प्रतिष्ठेच्या असणाऱ्या ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सुवर्णपदक पटकावले. भारताच्या बुद्धिबळाच्या इतिहासात अशी कामगिरी पहिल्यांदाच घडली असून यानिमित्ताने भारताने बुद्धिबळाच्या क्षेत्रातली महासत्ता बनण्याच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. भारताचे युवा बुद्धिबळपटू जणू बुद्धिबळाची नवी गाथा लिहिण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत ही बुद्धिबळाची जन्मभूमी. भारतात उगम झालेला बुद्धिबळ अन्य देशांमध्ये पोहोचला आणि रुजला. हा खेळ खेळाडूंच्या वैचारिक क्षमतेचा आणि एकाग्रतेचा अक्षरश: कस लावतो. बुद्धिबळ खेळणे निश्चितच सोपे नाही. या खेळाचे रितसर प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक चालीला तितक्याच चलाखीने प्रत्युत्तर द्यावे लागते. बुद्धिबळ म्हणजे खेळाडूच्या धैर्याची परीक्षाच जणू! अशा या खेळात भारताने मोठी मजल मारली आहे. बुद्धिबळ म्हटले की, विश्वनाथन आनंदचे नाव आपल्या डोळ्यांसमोर येते. आता भारताचे युवा बुद्धिबळपटू आनंदने दाखवलेल्या मार्गावरून पुढे जात त्याचा वारसा पुढे नेत आहेत.
बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी निर्णायक लढतीत ३.५ – ०.५ अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवले. पुरुष संघाने स्लोवेनियाचा तर महिला संघाने अजरबैजानच्या संघाचा पराभव केला. पुरुष संघाचे सुवर्णपदक दहाव्या फेरी अखेरीसच निश्चित झाले होते तर महिला संघाचे सुवर्णपदक अकराव्या फेरीनंतर निश्चित झाले. दुसऱ्या क्रमांकावर असणारा कझाकिस्तान भारताशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात होता. मात्र अमेरिकेने कडवी झुंज दिल्याने ही लढत २-२ अशी बरोबरीमध्ये सुटली. या बरोबरीमुळे भारताने १९ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला तर कजाकिस्तानला १८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताच्या महिला संघाने सलग सात फेऱ्यांमध्ये विजय मिळवत आपला वरचष्मा कायम राखला होता. मात्र आठव्या फेरीत त्यांना पोलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर नवव्या फेरीमध्ये त्यांनी अमेरिकेविरुद्ध बरोबरी साधली. दहाव्या आणि अकराव्या फेरीमध्ये अनुक्रमे चीन आणि अजरबैजानचा पराभव करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. अकराव्या फेरीत भारताने तीन सामने जिंकले. संघातल्या हरिका द्रोणावल्ली, दिव्या देशमुख आणि वंतिका अग्रवालने आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला तर वैशाली रमेशबाबूने बरोबरी करत भारताला ३.५ गुणांपर्यंत पोहोचवले. मराठमोळ्या दिव्या देशमुखने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना वैयक्तिक सुवर्णपदकही पटकावले.
भारताच्या पुरुष संघाने या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. पुरुष संघाने सलग आठ सामने जिंकल्यानंतर उजबेकिस्तान सोबतचा सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर दहाव्या फेरीत अमेरिका तर अकराव्या फेरीत स्लोवेनियाला पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या संघातल्या डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद आणि अर्जुन इरिगेसी यांनी अखेरच्या फेरीत आपापले सामने जकले. गुकेश आणि अर्जुनने पुन्हा एकदा महत्त्वाच्या सामन्यांमध्ये कामगिरी उंचावली तर प्रज्ञानंदने अखेरच्या फेरीत पुन्हा लय मिळवत भारताचा विजय सुलभ केला. भारताने अकराव्या फेरीनंतर २१ गुण मिळवत अव्वल स्थान राखले, तर चीन आणि अमेरिका प्रत्येकी १६ गुण मिळवून दुसऱ्या स्थानी राहिले. एकाच स्पर्धेत एकाच देशाच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक मिळवणाऱ्या देशांमध्ये भारत हा तिसराच देश ठरला असून याआधी चीन आणि सोव्हियत युनियनने अशी कामगिरी केली आहे. दरम्यान, या आधी भारताच्या पुरुष संघाने २०१४ आणि २०२२ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रत्येकी दोन कांस्यपदके पटकावली आहेत. महिला संघानेही २०२२ च्या ऑलिम्पियाडमध्ये एक कांस्य पदक पटकावले होते. मात्र यंदा या सगळ्या पायावर सोनेरी कळस चढला आहे. या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदकांसह भारताला चार वैयक्तिक सुवर्णपदकेही मिळाली आहेत.
या स्पर्धेच्या पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी पाच खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. म्हणजेच आपल्या दहा बुद्धिबळपटूंनी ऑलिम्पियाडचे सुवर्णपदक खेचून आणले. डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन एरिगेसी, विदित गुजराती आणि पी. हरिकृष्णा या पाच बुद्धिबळपटूंचा मिळून पुरुष संघ बनला होता तर महिला संघात तानिया सचदेव, वैशाली रमेशबाबू, हरिका द्रोणावल्ली, वंतिका अग्रवाल आणि दिव्या देशमुख या बुद्धिबळपटूंचा समावेश होता. भारताच्या या पंचकन्यांनी या स्पर्धेत अक्षरश: सर्वस्व पणाला लावले. पुरुष संघाबद्दल सांगायचे तर बुडापेस्ट बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खेळलेल्या ४४ सामन्यांपैकी या संघाने फक्त एकच सामना गमावला. भारताचे भविष्य असणारा डी. गुकेश बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेतल्या दहापैकी आठ सामन्यांमध्ये त्याने विजय मिळवला तर दोन सामने बरोबरीत सोडवले. विदित गुजरातीनेही या स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. त्याने दहा सामने खेळताना पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला तर पाच सामने बरोबरीत सोडवले. विदितला २०१३ मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळाला. अर्जुन इरिगेसीने या स्पर्धेत अकरा सामने खेळले आणि नऊ सामने जकले. दोन सामने बरोबरीत सुटले. त्याला वैयक्तिक सुवर्णपदकही मिळाले. २०१८ मध्ये ग्रँडमास्टर किताब पटकावल्यानंतर २०२२ च्या चेन्नई ऑलिम्पियाडमध्ये त्याने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले होते. पी. हरिकृष्णा हा या संघातला सर्वात वरिष्ठ खेळाडू. त्याने तीनपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामना बरोबरीत सुटला. त्याला २००१ मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळाला.
महिला संघातल्या तानिया सचदेवने २००८मध्ये ग्रँडमास्टर किताब पटकावला होता. मात्र त्यावेळी महिला बुद्धिबळपटूंची कामगिरी फारशी चांगली होत नव्हती. त्यामुळे तानियाने यंदा कारकिर्दीतले पहिलेच सुवर्णपदक पटकावले. तानियाने या स्पर्धेत पाच सामने खेळले. दोनमध्ये विजय मिळवला तर तीन बरोबरीत सुटले. २०११ मध्ये ग्रँडमास्टर किताब पटकावणाऱ्या हरिका द्रोणावल्लीने या स्पर्धेत नऊ सामने खेळले. त्यापैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला तर तीन सामने बरोबरीत सुटले. हरिकाला तीन सामने गमवावे लागले. २०२४ मध्येच ग्रँडमास्टर ठरलेल्या वैशाली रमेशबाबूने यंदा दहा सामने खेळले. त्यातल्या चार सामन्यांमध्ये विजय मिळवला तर चार बरोबरीत सोडवले. दोन सामन्यांमध्ये ती पराभूत झाली. वंकिता अग्रवालने नऊपैकी पाच सामने जकले तर तीन सामने बरोबरीत सोडवले. फक्त एका सामन्यात तिचा पराभव झाला. वंकिताला या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकही मिळाले. भारताची पहिल्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने या ऑलिम्पियाडमध्ये एकही सामना गमावला नाही. तिने अकरापैकी आठ सामने जिंकले तर तीन बरोबरीत सोडवले. तिला वैयक्तिक सुवर्णपदकही मिळाले. तिला गेल्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब मिळाला. महाराष्ट्रासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे.