Wednesday, January 22, 2025
Homeताज्या घडामोडीBaba Siddiqui : गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या

Baba Siddiqui : गोळ्या झाडून बाबा सिद्दीकी यांची हत्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच, बांद्रा पूर्वेत खैर नगर परिसरात ही घटना घडली.

बाबा सिद्दीकी निर्मल नगर येथील एका जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली. त्याआडून हा गोळीबार झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार होत असताना त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी होते. यादरम्यान त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे.

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेय. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.

त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खाती देखील सांभाळली. बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. २०००-२००४ या कालावधीत महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता. सिद्दिकी यांनी ८ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नंतर १२ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, राजकीय नेत्यावर गोळीबार झाल्याची मुंबईतील गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह करताना गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ५ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, यात घोसाळकर यांचा मृत्यू झाला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -