फिरता फिरता – मेघना साने
ज्या विद्यापीठातून मी पहिली डिग्री घेतली, त्याच विद्यापीठाचे व्याख्यान देण्यासाठी मला आमंत्रण आले होते. होय ! नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर मराठी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्रातील ‘हायकू’ची वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मला आमंत्रण होते. २०१८ साली मी ‘हायकू’ या विषयावर एम. फिल. केले हे विद्यापीठाला कळविले होते. नागपूर विद्यापीठात माझा
व्याख्यानाचा कार्यक्रम २७ सप्टेंबर, २०२४ ला ठरला.
ठरल्याप्रमाणे मी २७ सप्टेंबरला नागपूर विद्यापीठात हजर झाले. मराठी विभागाने माझे स्वागत केले. एका हॉलमध्ये एम. ए. आणि पीएच.डी. करत असणारे विद्यार्थी शांतपणे बसून वाट पाहत होते. डॉ. अमृता इंदूरकर यांनीच माझी ओळख करून दिली व अप्रतिम सूत्रसंचालन केले. कवयित्री मनीषा अतुल या अचानक तिथे भेटल्या. काही प्राध्यापक मंडळीही येऊन बसली होती. ‘हायकू’ या विषयावर महाराष्ट्राला अजून पुरेशी माहिती नाही. कवयित्री शिरीष पै यांनी ‘हायकू’चा प्रसार केला व त्यांची ‘हायकू’वर पुस्तके आहेत एवढे मात्र सर्वांना माहीत आहे. चारोळी हा प्रकार लिहायला इतका सोपा आहे तितका ‘हायकू’ सोपा नाही. खरं तर शिरीष पै यांच्याकडे मी माझ्या पहिल्या कवितेच्या पुस्तकाला प्रस्तावना मागायला गेले होते. तेव्हा माझ्या पुस्तकातील तीन ओळींच्या कवितांमध्ये काही ‘हायकू’ लपले आहेत, हे त्यांनी शोधून काढले होते. ‘हायकू’चे शास्त्र त्यावेळी त्यांनी मला समजावून सांगितले.
‘हायकू’ हा जपानी स्फुट काव्याचा प्रकार ! पहिल्या दोन ओळीत समोर दिसणाऱ्या दृश्याचे वर्णन असते आणि तिसरी ओळ कलाटणी देणारी असते. तिसरी ओळ लिहिल्यानंतर जीवनाचा अर्थ उलगडून सांगितला जातो. या तीन ओळी अशा लिहायच्या असतात की, त्यात उपमा, उत्प्रेक्षा वगैरे काही येता कामा नये. केवळ समोरचे दृश्य पाहिले आहे असे वाटावे.
अशा पद्धतीने लिहिले तरच तो ‘हायकू’ होतो.
फुलदाणीतील फुले
आत्ताच घे पाहून
उद्या जातील कोमेजून
काय अर्थ घ्याल या ‘हायकू’तून? “आज तारुण्य आहे. याचा आनंद आत्ताच घ्यायचा आहे. पुढे वार्धक्य येईल.” एका विद्यार्थ्याने हा अर्थ सांगितला. “बरोबर आहे. पण ‘हायकू’तून उलगडणारा अर्थ आपल्या अनुभवाप्रमाणे, आपल्या स्वभावाप्रमाणे, थोडा वेगवेगळाही असू शकतो.”
तो डोंगर तिथेच होता
पण वणवा पेटला
तेव्हा लोकांना दिसला
एखाद्याचे व्यक्तिमत्त्व संघर्षातच कसे उजळून निघते ते या ‘हायकू’तून दिसते. ‘‘‘हायकू’ हा पाच-सात-पाच अशा अक्षरबंधात असतो असे आम्ही ऐकले आहे.” एका विद्यार्थ्याने विचारले. “हो बरोबर आहे.” शिरीष पै यांनी जेव्हा ‘हायकू’ लिहिण्याचा प्रयत्न केला तो जपानी ‘हायकू’चा इंग्रजी अनुवाद वाचून केला होता. विजय तेंडुलकरांनी त्यांना इंग्रजी ‘हायकू’चे पुस्तक आणून दिले होते. आणि मराठी ‘हायकू’ लिहिण्याचा प्रयत्न करायला सुचविले होते. जपानी भाषेतील मूळ ‘हायकू’चा अभ्यास त्यांनी त्यावेळी केला नव्हता. पण तरी ‘हायकू’चा आत्मा बरोबर प्रकट होत होता. अर्थात काही वर्षांनी शिरीष पै यांनी देखील हे मान्य केले होतेच की, मराठीत पाच-सात-पाच अक्षरबंधात ‘हायकू’ लिहिला जाऊ शकेल.
“एखादे दृश्य डोळ्यांसमोर आणा. समजा एखादी ट्रेन येते आणि प्लॅटफॉर्मवर थांबते. मग काय घडेल?” मी विचारले.
“प्रवासी उतरतील. काही ब्रिजकडे जातील, काही स्टेशनमधून बाहेर पडतील. काही हमालांसाठी थांबतील.” मुलांनी उत्तर दिले. “चला, आता यावर लिहिलेला ‘हायकू’ सांगते.” मी सांगू लागले. गाडी थांबली प्रवासी उतरले आणि पांगले काही मुलांना ‘पांगले’ हा शब्दच माहिती नव्हता म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नार्थक चिन्ह दिसले. मग मी तोही समजावून दिला.
‘हायकू’च्या इतिहासातील काही गोष्टी मला त्यांना सांगाव्याशा वाटल्या. ‘हायकू’ हा तीन ओळींचा छोटासा काव्यप्रकार जपानमध्ये पाचशे वर्षांपूर्वी प्रथम लिहिला गेला. बाशो, बुसन, इस्सा हे जपानमधील ‘हायकू’कार जगप्रसिद्ध झाले आहेत. भारतात हा प्रकार कोणालाच सुचला नाही. त्याचे कारण काय? तर जपानमध्ये सतत भूकंप होत असल्याने जपानी लोकांची मनोरचना क्षणभानवादी झाली होती. आता समोर आहे तो क्षण खरा, पुढे काय होईल माहीत नाही. म्हणून त्या क्षणावरतीच कविता लिहितात. तेथील निसर्गही तसाच. प्लम फुलांचा बहर येतो आणि गळून जातो. त्याला ‘साकुरा’ म्हणतात. काही दिवस सगळीकडे निसर्ग फुललेला असतो आणि नंतर सगळी झाडे उघडी बोडके झालेली असतात. त्यामुळे स्थिर असे काहीच नाही असे वाटू लागते.
जपानने आपली बंदरे जगाला खुली केली तेव्हा ‘हायकू’ प्रथम जपानमधून अमेरिकेत गेला आणि मग तिथून अनेक देशांमध्ये पोहोचला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर १९१६ साली जपान येथे गेले होते. तेथे त्यांनी ‘हायकू’ काव्य प्रकाराचा थोडा अभ्यास केला. भारतात आल्यावर वर्तमानपत्रात त्याबद्दल एक लेख लिहिला. मात्र भारतात, महाराष्ट्रात त्यावेळी स्वातंत्र्य चळवळी सुरू होत्या. त्यामुळे वातावरण इतके वेगळे होते की, या तीन ओळींच्या ‘हायकू’ नावाच्या रचनेकडे कोणी लक्ष दिले नाही. तसेही त्यावेळी महाराष्ट्रात अनेक व्यक्तींवरील दीर्घ कविता, बखरी, अध्यात्मिक कविता, संतांच्या रचना यांना साहित्य समजले जात होते. त्यामुळे या स्फुट प्रकाराकडे कोणी गांभीर्याने पाहिलेही नाही.
पुढे काव्यप्रकार विकसित होत गेला. वेगवेगळ्या प्रकारच्या रचनांना आम्ही स्वीकारले. कवी मुक्त छंदात लिहू लागले. कविवर्य सुरेश भट यांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत आणला आणि शिरीष पै यांनी ‘हायकू’ हा प्रकार मराठीत आणला त्याचे लोकांनी स्वागत केले. शिरीष पै यांचे १९७९ ते २०१५ या काळात दहा ‘हायकू’ संग्रह प्रकाशित झाले. मी लिहिलेले काही ‘हायकू’ येथे देत आहे.
पालापाचोळा
जरा उंच उडतो
पुन्हा पडतो
सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रगतीचे क्षण येतात, पण काहीच काळ. पुन्हा तो खाली पडतो. अशी त्याची धडपड सुरू असते. स्ट्रगल सुरूच असतो. ‘हायकू’त समोरच्या दृश्याचे वर्णन असते पण त्यातून अर्थ मात्र वेगळा निघतो. म्हणजेच ते काव्य आहे. डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी अतिशय सुंदर असा समारोप केला. या कार्यक्रमाला कवी आरती प्रभू यांची कन्या कवयित्री हेमांगी नेरकर यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर मी लिहिलेले ‘असा बरसला ‘हायकू’ हे ‘हायकू’चे पुस्तक विद्यार्थ्यांनी आवर्जून मागून घेतले आणि आता आम्ही लिहिलेले ‘हायकू’ तुम्हाला पाठवू असे कबूल केले.