पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात (Bopdev Ghat gang rape) अखेर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने दोन संशयितांना नागपूर मधून ताब्यात घेतले. तर बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेले नाही. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
बोपदेव घाट परिसरात गुरुवारी रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात आले. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.
बोपदेव घाटातील मोबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे.