भाईंदर : मीरा रोड येथील नया नगर भागात भररस्त्यात पतीने आपल्या पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. परंतू त्यात तिचा मृत्यू न झाल्याने त्याने गळा चिरून तिची हत्या केली. दोघात घटस्फोटाची न्यायालयात लढाई सुरू असताना मुलाचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादामुळे असे कृत्य केल्याची प्राथमिक महिती पोलिसांना मिळाली आहे.
मीरा रोडच्या नया नगर भागात नदिम खान आणि त्याची पत्नी अमरीन दोघे राहत होते. काही दिवसापासून त्यांच्यात वाद सुरू होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले होते. न्यायालयात याचिका सुरू असताना मुलाचा ताबा आईकडे देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार मुलाची आई अमरीन नया नगर येथिल नदीम खान यांच्याकडे न्यायालयाचा आदेश घेऊन आली होती. त्यापूर्वी गुरुवारी तिने नया नगर पोलीस ठाण्यात यासाठी संरक्षण मागितले होते. त्यासाठी आवश्यक ते शुल्क भरले होते. तिला पोलिसांनी शुक्रवारी दुपारनंतर संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार ती आली असता नया नगर भागातील मुख्य रस्त्यावर पती नदीम खान याने तिला गाठून तिच्यावर हल्ला केला. नंतर तिचा गळा चाकूने चिरून तिची हत्या केली.
रस्त्यावर गस्त घालत असलेले पोलीस व लोकांनी नदीम याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथे त्याने मुलाचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादामुळे नैराश्य येऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते तथा प्राध्यापक डॉ सुरेश येवले यांनी पोलिसांनी न्यायालयाचे आदेश असूनही हलगर्जीपणा दाखविल्याचा आरोप केला आहे. तर पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पोलिसांनी अमरिनला संरक्षण दिले होते परंतु तिचा पती बाहेर गावी गेला असल्याने तिला शुक्रवारी बोलाविण्यात आले होते, असे सांगितले आहे.