Monday, December 9, 2024
Homeताज्या घडामोडीवर्सोव्यात साकारले सावित्रीबाई फुले बोटॅनिकल गार्डन!

वर्सोव्यात साकारले सावित्रीबाई फुले बोटॅनिकल गार्डन!

अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण

मुंबई : वर्सोव्याच्या काँक्रीटच्या जंगलात सुमारे ५ एकर जागेवर आकर्षक सावित्रीबाई फुले बोटॅनिकल गार्डन साकारले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, प्रसिद्ध गायिका, बॅकर अमृता फडणवीस यांच्या हस्ते वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील जोगेश्वरी पश्चिम येथील सदर उद्यानाचे आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून या भागातील प्रसिद्ध अभिनेत्या व संगीतकरांच्या उपस्थितीत या उद्यानाचे लोकार्पण झाले. येथील स्थानिक भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी त्यांच्या फंडातून येथे आगळे वेगळे उद्यान साकारून वर्सोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, संगीतकार डब्बू मलिक, संगीतकार जसमिंदर कौर, निर्माते कार्यकर्ते शशीरंजन, माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर, माजी नगरसेविका रंजना पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, डॉ. भारती लव्हेकर यांनी दूरदृष्टी ठेवून येथील सध्याच्या काँक्रीट जंगलात लाडक्या बहिणींना ऑक्सिजन मिळण्यासाठी सावित्रीबाई फुले बोटॅनिकल गार्डन येथे साकारले आहे. या उद्यानात फुलपाखरू उद्यान, डेन फॉरेस्ट, हर्बल पार्क, व्यासपीठ, गजीबो आणि अनेक सुविधा असून जे पाहिजे ते सर्व या उद्यानात उपलब्ध आहे. सर्व नागरिकांनी या उद्यानाचा लाभ घ्यावा आणि आपला परिसर सुंदर व स्वच्छ ठेवावा असे त्यांनी आवाहन केले. आम्ही डॉ. भारती लव्हेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून त्या माझ्या पाठीमागे उभे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. जनतेत राहून त्यांना सेवा सुविधा मिळवून देण्यासाठी मला नेहमी आवडते, असे त्यांनी सांगितले.

आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, सिमेंटच्या जंगलात वर्सोव्याच्या नागरिकांना ऑक्सिजन कसा चांगला मिळेल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, मी याच मतदार संघात रहाते. डॉ. भारती लव्हेकर यांनी सिमेंटच्या जंगलात साकारलेल्या उद्यानाचा मी नक्कीच आनंद घेईन. त्यांनी या भागाला अनेक सुविधा देत या परिसराचा वटवृक्ष केला आहे. अश्या प्रकारची उद्याने मुंबईत ठिकठिकाणी साकारली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या की, या भागात एक चांगले उद्यान भारती लव्हेकर यांनी उभारून या भागाचा कायापालट केला आहे.अश्या प्रकारची चांगली उद्याने वर्सोवा भागात साकारली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भर पावसात येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -