पुणे : राज्यात मान्सूनचा परतीचा पाऊस चांगलाच झोडपतो (Heavy Rain) आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. मागील आठवड्यापासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. आणखीही काही दिवस असेच जोरदार पावसाची शक्यता (Rain Alert) हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुढील २४ तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अन्य भागांतही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आजही काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या पुणे शहरासह नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि राज्यातील अन्य भागांत येत्या एक ते दोन दिवसांत पावसाची शक्यता आहे. यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत परतीच्या पावसाचे चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे. या काळात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.