अमरावती : अकोल्यावरून नागपूरला निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला बडनेरा येथील पोलीस स्टेशन समोर अचानक भीषण आग लागली. या आगीत शिवशाही बस जळून खाक झाली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे वीस प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना आज सकाळी दहाच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील गणेश पेठ आगाराची शिवशाही एसटी बस क्रमांक एमएच ०६ बीडब्ल्यू ०९०३ ही बस नादुरुस्त असल्यामुळे दोन दिवसापासून अकोला आगारात उभी होती. तात्पुरती दुरुस्ती करून अकोल्यावरून नागपूरला ही बस बोलावण्यात आली. मात्र गणेश पेठ आगाराचे व्यवस्थापक यांनी विना कंडक्टर बस घेऊन व प्रवासी भरून आणण्यास सांगितल्याचे समजते. त्यानुसार चालक ए आर लासुरकर यांनी आदेशाचे पालन करीत वीस प्रवासी घेऊन अकोल्यावरून नागपूर करिता रवाना झाले.
बडनेरा नजीक एसटी बस मध्ये बिघाड असल्याचे लक्षात येतात. चालक लासुरकर यांनी प्रवाशांना उतरून दुसऱ्या बसमध्ये पाठविले व रिकामी बस घेऊन नागपूरकडे रवाना झाले असता बडनेरा येथील पोलीस स्टेशन समोर अचानक टायर फुटले व बस थांबेपर्यंत शंभर फुटाच्या अंतरावर बस थांबल्यानंतर अचानक टायरने पेट घेतला व काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.
सुरुवातीला नागरिकांनी पाण्याच्या बकेटने पाणी मारून आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु आगीने भीषण रूप घेतल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरले. बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील चव्हाण व पोलीस कर्मचा-यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
दुर्दैवाने याचवेळी बडनेरा मनपाचे अग्निशामक दल राज्यपालांच्या बंदोबस्ताकरिता बेलोरा विमानतळावर असल्याने अग्निशमन दल येण्यास विलंब झाला. तोपर्यंत बसचा बराच भाग जळून खाक झाला होता. मात्र अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आली.