देशाच्या उद्योग क्षेत्रातील रत्न हरपलं आिण कोट्यवधी जनतेच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध उद्योगपती तथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. उद्योगपती आणि समाजसेवक तसेच आपल्या परोपकारी कामामुळे चर्चेत असलेले रतन टाटा यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक सव्यसाचे उद्योजक, परोपकारी सेवेमुळे चर्चेत राहिलेले उद्योगपती आणि टाटा समूहाचे प्रमुख म्हणून कायम औद्योगिक विश्वात ओळख असलेला उद्योगपती हरपला.
टाटा यांची उद्योगपती म्हणून ओळख असण्यापेक्षा त्यांची ओळख ही परोपकारी कामात चर्चेत असल्याबद्दल जास्त होती. रतन टाटा हे त्यांच्या व्यावसायिक कौशल्य आणि उद्योगपती म्हणून त्यांच्या निपुणतेबद्दल ख्यातनाम होते. पण टाटा समूहाचे समाजसेवक म्हणूनही त्यांना लोक ओळखतात हे महत्त्वाचे आहे. रतन टाटा गेले तेव्हा त्यांनी आपली संपत्ती मागे ठेवली ती ३,८०० कोटी रुपयांची. टाटा समूहाने ३० लाख कोटी रुपयांचे नेट वर्थ उभे केले. टाटांच्या निधनानंतर आता औद्योगिक विश्वावर शोककळा पसरली आहे आणि याला कारण आहे ते टाटांनी उद्योग म्हणून आपल्या उद्योगाकडे कधीच पाहिले नाही, तर टाटांचा ब्रँड आज तळागाळापर्यंत लोकप्रिय करण्यात त्यांनी सारी ऊर्जा खर्च केली.
रतन टाटांनी विवाह केला नाही आणि त्यांना मुलेबाळेही नाहीत. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न आता बिकट झाला आहे. रतन नवल टाटा यांनी केवळ ‘असामान्य नेतृत्वच केले नाही, तर आपल्या अतुलनीय योगदानामुळे राष्ट्राची रचना देखील घडवली आहे’, ही त्यांना वाहिलेली टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. देशातील गरिबांच्या स्वप्नातील वाहन आणण्याचे स्वप्न टाटांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षात करूनही दाखवले. नॅनो कारही त्यांचीच भारतीय सामान्य माणसाला दिलेली भेट होती. या वाहनाची किंमत तेव्हाही फक्त एक लाखाच्या आसपास होती. टाटा या समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले.
टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती आणि रतन टाटा त्यात सामील झाले. त्यांच्या अनेक पिढ्यांनी टाटा उद्योगसमूहाचा जगभर विस्तार केला, जसे त्याचे वैशष्ट्य होते तसेच अक्विझशन आणि अनेक परदेशी कंपन्या त्यांनी आपल्या साम्राज्यात विलीन केल्या. त्यांना अक्विझिशन किंग म्हणून ओळखले जाऊ लागले होते. रतन टाटा यांना पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले होते आणि सर्वात मोठ्या टाटा उद्योगसमूहाचे ते अध्यक्ष होते. टाटा हे त्यांच्या समूहासाठी केवळ अध्यक्ष यापेक्षा खूप काही होते. सर्वोत्कृष्टतेबद्दलचा ध्यास, एकात्मता आणि नावीन्यपूर्ण संशोधन अशा अनेक प्रकारांत ते गणले जायचे. त्यांच्या अध्यक्षतेखाली टाटा समूह जगभर आपल्या साम्राज्यात झपाट्याने वाढ करू शकला आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली टाटा समूहाने अनेक शिखरे पादाक्रांत केली. रतन टाटा यांच्याबाबत काय सांगता येईल तर निखळ राष्ट्रप्रेम, उच्च कोटीची उद्योजकता आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असा दुर्मीळ संगम असलेले टाटा यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते दूरदृष्टीचे तर होतेच पण फिलांथ्रोपिस्ट म्हणून ही प्रसिद्ध होते. १९३७ मध्ये जन्मलेले टाटा यांचे शिक्षण रिव्हरडेल येथील कंट्री स्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी आर्किटेक्चची पदवी घेण्यासाठी न्यूयॉर्क येथे गेले. त्याचबरोबर त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. नंतर त्यांनी हार्वर्ड स्कूल येथे १९७५ मध्ये व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. १९६१ मध्ये टाटांनी टाटा स्टीलमध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि नंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिले नाही. त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरत गेली आणि अखेरीस ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्याच कार्यकाळात एअर इंडिया ही त्यांचे आजोबा जमशेदजी टाटा यांनी रक्ताचे शिंपण करून उभी केलेली कंपनी तत्कालीन नेहरू सरकारने घशात घातली होती. काँग्रेसचे एक मंत्री होते रफी अहमद किडवाई. त्यांनी ही कंपनी नेहरूंना शासनाच्या घशात घालायला लावली आणि नेहरूंचा उद्दामपणा असा की याच कंपनीच्या सर्वेसर्वा म्हणून टाटांना काम पाहण्यास सांगितले. पुढे ती कंपनी भारत सरकारने चालवायला घेतली आणि पुढे तिचे दिवाळे वाजले. तेव्हा ती कंपनी टाटांनी पुन्हा विकत घेतली. हा इतिहास झाला. पण टाटांनी कसे आपलेच उद्योगविश्वातील पिल्लू काँग्रेसला दिले आणि पुन्हा ते कसे घेतले याचा रंजक इतिहास आहे.
१४० कोटी देशवासीयांच्या भारतात फारच थोडे उद्योजक आहेत की त्यांना आज टाटांपेक्षा जास्त मान दिला जातो. उद्योगपती म्हणजे रक्तपिपासू अशी प्रतिमा सर्वसामान्यांची असते. तिला छेद देणारे असे हे रतन टाटांचे वर्णन होते. दोन दशकांहून अधिक काळ रतन टाटा हे देशातील नामवंत उद्योगपती होते आणि त्यांनी टाटा ग्रूपच्या अध्यक्षपद सांभाळले. टाटा यांच्या आयुष्यात कोणतेही मोठे वाद निर्माण झाले नाहीत आणि असा हा एकमेव उद्योगपती असावा. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत टाटा समूहाचा महसूल १०० अब्ज डॉलर इतका गेला होता आणि हे त्यांचे कर्तृत्व काही कमी मोलाचे नाही. रतन टाटांची सुरुवात अत्यंत माफक परिस्थितीत झाली आणि त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि कार्यकुशलतेने या सुरुवातीचे रूपांतर एका चांगल्या अालिशान राहणीमानात केले. रतन टाटा यांनी लाखो भारतीयांच्या जीवनमानावर परिणाम केला हे वास्तव आहे. संचालक असतानाही त्यांनी कधीही काम करताना आळस केला नाही आणि हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांना सर्वोत्कृष्ट उद्योगपती म्हणून लौकिक मिळवून देणारे ठरले. उद्योगपती असतानाही सामान्य माणसाच्या व्यथा, वेदना यांची जाणीव असलेला उद्योगपती म्हणून त्यांची ओळख होती आणि म्हणून त्यांनी कधीही कामात भेदभाव केला नाही. टाटांचे मूल्यांप्रति असलेली श्रद्धा तीच होती, जी पूर्वी होती. कारण त्यांच्या उद्योगातील कोणताही कामगार आणि सीईओ एकत्र बसून जेवण घेतात आणि त्यांची ही कामाची संस्कृती होती. रतन टाटा यांचे जीवन एक आदर्श होते आणि त्यामुळे त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळाली हे सत्य होते.