मुंबई : यशस्वी उद्योजकाचे उत्तम उदाहरण, परोपकार वृत्ती असणारे दयाळू व्यक्तीमत्त्व, प्राणीमात्रांवर पराकोटीचे प्रेम आणि माणसातले माणूसपण जपणाऱ्या रतन टाटा अनंतात विलीन झाले. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्याकरता देशभरातील असंख्य लोक मुंबईत दाखल झाले होते. पारशी समाजाच्या विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत स्मशानभूमीत त्यांनी अखेरचा निरोप दिला. त्याआधी मुंबई पोलिसांनी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली.
टाटा यांचे पार्थिव दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे गुरुवारी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीतील स्मशानभूमीत नेण्यात आले. केंद्राच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि इतर मंत्री आणि अंबानींसारखे उच्च उद्योजक, शरद पवार, अनिल देशमुखांसह विविध पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. टाटा हे पारशी समाजाचे होते. परंतु, त्यांच्यावर हिंदू रितीरिवाजानुसार विद्युत वहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी टाटांचे पार्थिव नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे सर्व स्तरातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांचा पाळीव ‘गोवा’ श्वानाने त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी (दि.९) रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) ७ ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी स्वत: या गोष्टीचा इन्कार करत आपण बरे असल्याचे सांगत रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचे सांगितले होते.