समर्थ कृपा – विलास खानोलकर
श्री पादभटांचा स्वामीचरणी पूर्ण विश्वास असल्याकारणाने पाच-सहा भक्त कंदील घेऊन पलिकडच्या मळ्यात गेले. तेथे एक तेजस्वी स्त्री एका वटवृक्षाखाली उभी होती. तिच्याजवळ जाऊन तिला नमस्कार करून श्रीपादभटांनी तिला विचारले, ‘येथून गाव किती लांब आहे? आणि काही अन्नाची सोय होईल काय?’ त्यावर ती बाई सांगू लागली, ‘आज आमच्या गावातील काही मंडळी येथे भोजनास यावयाची होती. त्यांच्याकरिता स्वयंपाक करून ठेवला आहे. अद्याप कोणीही आले नाही. या अन्नाचे काय करावे म्हणून मी मोठ्या काळजीत आहे. तुम्ही आलात फार चांगली गोष्ट झाली. आता कृपा करून हे तयार अन्न घेऊन जा. येथे पाणीही आहे.’
तेव्हा श्रीपादभट आणि त्यांच्याबरोबरचे भक्त सर्व अन्न व फळफळावळ घेऊन निघाले. तेवढ्यात श्रीपादभटांनी त्या तेजस्वी स्त्रीला विचारले, ‘तुम्ही येथे जंगलात एकट्या कशा राहाल?’ आमच्या बरोबरच स्वामीसमर्थ महाराजांच्या दर्शनाला चला. यावर ती तेजस्वी स्त्री हात जोडून म्हणाली, ‘श्री स्वामी समर्थ’ महाराजांना माझा शिरसाष्टांग नमस्कार सांगा. माझे नाव अन्नपूर्णा, मी मागावून दर्शनाला येते, तुम्ही पुढे चला. श्रीपादभट व बरोबरचे मंडळी ते अन्न व शिधा घेऊन निघाली. लगोलग श्रीपादभटांनी मागे वळून पाहिले, तर ती तेजस्वी स्त्री आकाशात अंतर्धान पावली होती. या चमत्काराचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. जेथे स्वामी महाराज होते तेथे ती मंडळी अन्न व जेवण घेऊन आली. नंतर श्री स्वामी समर्थांना केळीच्या पानावर नैवेद्य दाखविला. स्वामी समर्थांसह भक्तगणही यथेच्छ भरपूर जेवली. अन्नदाता सुखीभव असा आशीर्वादही भक्तांनी त्या स्त्रीला दिला आणि स्वामींचे भक्त बाबा जाधवांनी समर्थांना विचारले, महाराज ती तेजस्वी स्त्री कोण व कुठून आली? त्यावर स्वामी महाराज म्हणाले ती आमच्याच कुटुंबातील साक्षात अन्नपूर्णादेवी होती. तेव्हा सर्वांची खात्री झाली की, महाराज नेहमी म्हणत असत, अन्नपूर्णादेवीकडे भोजनाला चला, तर हीच ती वटवृक्षाखाली अदृश्य झालेली साक्षात अन्नपूर्णादेवी होती. तर हीच ती संपूर्ण जगाला अन्न पुरविणारी, शेतकऱ्यांना समृद्ध करणारी अन्नपूर्णादेवी हीच आहे. स्वामीसमर्थ त्यांचे कुटुंब प्रमुख आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदू स्त्रीच्या देवघरात लक्ष्मी, सरस्वती, गणपती, स्वामी समर्थ महाराज, हनुमान व अन्नपूर्णादेवीची मूर्ती असतेच. म्हणूनच घरातील प्रत्येक स्त्रीला, मातेला, पत्नीला, भगिनीला अन्नपूर्णादेवीचं मानले जाते.
वदनि कवळ घेता
नाम घ्या श्रीहरीचे ।
सहज हवन होते
नाम घेता फुकाचे ।
जीवन करि जिवित्वा
अन्न हे पूर्णब्रह्म ।
उदरभरण नोहे
जाणिजे यज्ञकर्म ।।१ ।।
!! बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!