Saturday, May 17, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

सर्वांचे केंद्रस्थान

सर्वांचे केंद्रस्थान

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै


आपण सध्या निरूपणाला जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे परमेश्वर. मी या आधीही अनेकदा सांगितले आहे की, परमेश्वर आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे. तो इतका महत्त्वाचा आहे की, परमेश्वर हा आपल्या जीवनाचे केंद्र आहे. मानवी जीवनाचे केंद्र, वैश्विक जीवनाचे केंद्र, भूतमात्रांच्या जीवनाचे केंद्र परमेश्वर आहे. हे जर नीट लक्षात घेतले, तर परमेश्वर हा किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. मी मागल्या खेपेस सांगितले होते की, परमेश्वराचा सर्व बाजूने जर आपण विचार केला, तर तुम्हाला असे कळून येईल की, एका बाजूने परमेश्वराचा संबंध धर्म, संस्कृती, नियती, पापपुण्य, सुखदुःख, नशीब यांच्याशी येतो. दुसऱ्या बाजूने जग, कुटुंब, शरीर, इंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन यांच्याशी येतो. तिसऱ्या बाजूने व्यक्ती, समाज, राष्ट्र, विश्व यांच्याशी परमेश्वराचा संबंध येतो, तर चौथ्या बाजूने सुख, समाधान, शांती, आनंद, यश, समृद्धी यांच्याशी येतो म्हणजे आपण जर या चारही बाजूने विचार केला, तर परमेश्वर केंद्रस्थानी आहे. परमेश्वर हे तत्त्व जर माणसाला समजले, समाजाला समजले, लोकांना समजले, तर जगाचे नंदनवन होईल हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जगाचे नंदनवन होईल तेव्हा होईल पण आपण आपल्या घरापासून तर सुरुवात करूया. आपण आपल्या घराचे नंदनवन करूया. जीवनविद्या ही सर्वात व्यावहारिक आहे.


सांगायचा मुद्दा ज्याला आपण परमेश्वर असे म्हणतो तो परमेश्वर हवे प्रमाणेच वर, खाली, मागे, पुढे, असा सर्वत्र वास करून असतो. वास्तविक आपले उठणे, बसणे, खाणे-पिणे, झोपणे, जागे होणे वगैरे सर्व व्यवहार परमेश्वर स्वरूपातच चाललेले असतात. असे असून सुद्धा हवेप्रमाणे परमेश्वर डोळ्यांना दिसत नाही. कानांना ऐकू येत नाही. नाकाने त्याचा वास घेता येत नाही. जिभेने त्याला चाखता येत नाही किंवा हाताने त्याला स्पर्श करता येत नाही. मग परमेश्वराचा साक्षात्कार व्हायचा कसा? याचे उत्तर असे की, नाक धरले की, हवेचा साक्षात्कार होतो, म्हणजे अनुभव येतो. त्याचप्रमाणे आपल्याला जर मन धरता आले, तर परमेश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजेच त्याच्या अस्तित्त्वाचा अनुभव येतो. चारही बाजूने विचार केला, तर परमेश्वर केंद्रस्थानी आहे म्हणून परमेश्वराचे आपल्या जीवनांत किती महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपण धर्म धर्म म्हणतो पण धर्म म्हणजे काय व त्याचा परमेश्वराशी संबंध काय हे जर नीट लक्षात घेतले नाही, तर सगळे चुकीचे होईल. परमेश्वराच्या एका बाजूने निसर्गनियम येतात आणि दुसऱ्या बाजूने दिव्य जाणीव, दिव्य ज्ञान, दिव्य आनंद येतो. तिसऱ्या बाजूने व्यक्ती, समाज, भूतमात्र या गोष्टी येतात. या सर्व बाजूने विचार केला, तर परमेश्वराचे महत्त्व तुमच्या ध्यानात येईल. परमेश्वर एकदा समजला की, सुख, शांती, समाधान हे सर्व यायला लागते. परमेश्वर एकदा समजला की, आपला जगाशी संबंध येतो तेव्हा कसे वागायचे, कुटुंब कसे सांभाळायचे, आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची, बहिर्मनाची काळजी कशी घ्यायची, अंतर्मनाचा संबंध काय या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागतात म्हणून परमेश्वर या सर्व विषयांच्या केंद्रस्थानी आहे हे लक्षात घेऊन हा विषय नीट समजावून घेतला पाहिजे.

Comments
Add Comment