Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRatan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता...

Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचे अंत्यदर्शन

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी बोलताना राज्यातील सर्व मनोरंजन आणि उत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. तसेच, त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगपतींपासून मनोरंजन, राजकारण आणि क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्यांचे पार्थिव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार आहे. राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असून सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ हा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.

टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.

“आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी गेट ३ वरून एनसीपीए लॉनमध्ये प्रवेश करावा आणि बाहेर जाण्यासाठी गेट २ चा वापर करावा. एनसीपीएच्या आवारात पार्किंगची जागा उपलब्ध नसणार आहे. दुपारी ४ वाजता, त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमी, डॉ ई मोसेस रोड, वरळी येथील प्रार्थना हॉलमध्ये अंतिम प्रवासाला निघेल,” असे टाटा समूहाने निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर मिळालेल्या प्रेम आणि सहानुभूतीबद्दल टाटा कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. “आम्ही, त्यांचे भाऊ, बहिणी आणि कुटुंबीय, ज्यांनी त्यांचे कौतुक केले त्यांच्याकडून अपार स्नेहाने सांत्वन स्विकारतो. ते यापुढे आपल्यात नसले तरी त्यांची नम्रता, औदार्य आणि हेतूचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील,” असे टाटा समूहाने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -