Saturday, November 9, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखRatan Tata : उद्योगरत्न रतन टाटा

Ratan Tata : उद्योगरत्न रतन टाटा

महाराष्ट्र सरकारचा पहिला-वहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू राहिलेले रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला. टाटांचे वय लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घरी जाऊन टाटांना हा पुरस्कार दिला. त्यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड योग्य नाही, असे कुणीही म्हणणार नाही. रतन टाटा या नावामागेच भारतीय उद्योगजगताचे सारे सर्वस्व सामावलेले आहे. रतन टाटा यांनी १९९१ साली तत्कालीन टाटा उद्योग समूहाचे प्रमुख जेआरडी टाटा यांच्याकडून उद्योगाचे प्रमुखपद स्वीकारले. ते जेव्हा या पदावर होते तेव्हा टाटा उद्योग समूहाचे उत्पन्न पन्नास पटींनी वाढवूनच टाटांनी दुसऱ्याच्या हाती पद सोपवले.

टाटा उद्योग समूह म्हणजे निव्वळ उद्योग समूह नाही तर त्यामागे संस्कृती, कामगार वर्गाची प्रतिष्ठा आणि कामगारांचा मालकावर असलेला विश्वास ही सारी परंपरा येते, याचे भान रतन टाटांना नेहमीच राहिले. त्यामुळे त्यांच्या काळात आणि पूर्वीही टाटांनी औद्योगिक नितीमत्ता जपली आणि तिचाच कायम पाठपुरावा केला. रतन टाटा याच्या उद्योगाप्रती असलेल्या निष्ठेचे एकच उदाहरण पुरेसे आहे. टाटा यांच्या ताजमहाल पॅलेस हॉटेलवर जेव्हा अतिरेकी हल्ला झाला तेव्हा टाटा स्वतः हॉटेलमध्ये यायला निघाले होते. कारण तेथे एकही टेलिफोन ऑपरेटर जागेवर हजर नव्हता. जेआरडी टाटा यांनी अत्यंत मेहनतीने विमान कंपनी सुरू केली आणि तिचे नाव होते एअर इंडिया. ही कंपनी आजही लोकप्रियतेच्या बाबतीत शिखरावर आहे. जरी ती आज कर्जबाजारी झाली असली तरीही तिच्या महाराजाला कुणीही विसरणार नाही. साम्यवादाच्या बिनडोक तत्त्वज्ञानाकडे आकर्षिले गेलेले पंडित नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले एक मंत्री रफी अहमद किडवाई यांच्या बिनडोक आग्रहामुळे ही कंपनी सरकारच्या घशात घातली. उद्योग सरकारला चालवायची अक्कल नाही, ही अक्कल तेव्हा राज्यकर्त्यांना आली नव्हती. रतन टाटा यांच्या काळात पुन्हा टाटा समूहाकडे ही कंपनी आली. पण जेव्हा जेआरडी यांनी टाटा समूहाचे प्रमुख म्हणून रतन टाटा यांच्या नावाची घोषणा केली तेव्हा कंपनी कर्जबाजारी झाली होती. दररोज पन्नास हजार कोटी रुपयांचे कर्ज कंपनीवर झाले होते.

सरकारचा फाजिलपणा इतका की, जेआरडी यांची कंपनी घशात घालून त्यांनाच पुन्हा कंपनीचे प्रमुख म्हणून काम पाहण्यास सांगण्यात आले होते. रतन टाटा यांचे टाटा सन्सचे प्रमुख म्हणून नाव जाहीर होताच उद्योग वर्तुळातून बरीचशी नाराजीच व्यक्त करण्यात आली. रतन टाटा यांची समूहाचे प्रमुख म्हणून झालेली निवड योग्य नाही, असा सूर उमटत होता. पण रतन टाटा यांनी नंतर अशी काही भरारी मारली की सारा समूह आश्चर्यचकित होऊन पाहातच राहिला. टाटा सन्सचा प्रमुख हाच टाटा उद्योग समूहाचा प्रमुख असतो. रतन टाटा १९६१ मध्ये उद्योग समूहात जॉईन झाले आणि १९९१ मध्ये जेआरडींनी त्यांच्याकडे उद्योगाची सूत्रे बहाल करून कंपनी सोडली. त्यानंतर टाटा समूह आणि रतन टाटा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. रतन टाटा हे एक उदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी जितकी आर्थिक मदत केली आहे, तितकी ती कुणीही केलेली नाही. मुकेश अंबानी यांनीही नाही.
रतन टाटा यांच्याकडे उद्योगाची सूत्रे आली तेव्हा टाटा समूह नेहमीप्रमाणे आघाडीवर होता. आज नव्वदीच्या घरात असलेले टाटा अजूनही फिरतात आणि तितक्याच आस्थेने उद्योगाची देखरेख करतात. रतन टाटा यांच्यावर जेआरडींनी जो विश्वास टाकून त्यांच्याकडे उद्योगाची सूत्रे दिली, त्याला रतन यांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. रतन टाटा हे नवल टाटा यांचे सुपुत्र आहेत. टाटा समूहाचे अध्यक्षपद त्यांनी १९९० ते २०१२ इतका प्रदीर्घकाळ सांभाळले. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याची विषारी चर्चा विरोधी पक्ष आज करत असताना रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार दिला जावा, यास वेगळे महत्त्व आहे. रतन टाटा यांचा भर इतर उद्योगांचे ग्रहण करण्याकडे राहिला आहे. टाटा टीच्या अंतर्गत त्यांनी विविध उद्योग अधिग्रहित केले आणि आपले ६० ते ६५ टक्के उत्पन्न धर्मादाय मदतीसाठी दान केले आहे. शिवाय त्यांनी या दानाची कसलीही जाहिरात केली नाही.विविध समूहांमध्ये रतन टाटा यांनी भरपूर गुंतवणूक केली आहे आणि त्यांच्या या गुंतवणुकीच्या जोरावरच तर टाटा उद्योग समूह सुस्थितीत आहे.

रतन टाटा यांनीच सामान्य मध्यमवर्गीयांच्या जीवनात त्यांचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा नॅनो कार हे वाहन आणले होते. दुर्दैवाने त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. ते स्वस्त होते पण येथील रस्त्याची अवस्था पाहता ते चालू शकले नाही. पण टाटा नॅनोकारने कित्येक लाख मध्यमवर्गीयांचे स्वतःची कार असल्याचे स्वप्न काही काळ तरी पूर्ण केले. ही कार मजबूत नव्हती, हा तिचा सर्वात मोठा दोष होता. कोणतेही मोठे वाहन बाजूने गेले तरीही ही कार मुळापासून हादरायची. आता ती दिसतच नाही. ३० हून अधिक स्टार्ट अप्समध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. रक्ताने रतन टाटा हे टाटा कुटुंबापैकी एक आहेत. १९७० मध्ये टाटा यांना कंपनीत व्यवस्थापनाचे पद देण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर टाटा स्टील्सची जबाबदारी सोपवण्यात आली. पण टाटा यांचा प्रवास काही सुखकर नव्हता. टाटांच्या प्रत्येक कंपनीच्या प्रमुखाकडून त्यांना सुरुवातीच्या काळात विरोध सहन करावा लागला होता. त्यानंतर आज त्यांना भारतरत्नच्या तोडीचा उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -