ऋतुराज – ऋतुजा केळकर
दिवस आणि रात्र यामधला संधिप्रकाश तो काळ म्हणजे कातरवेळ… अशावेळी खूपच हळवे झालेले माझे मन… स्वामींच्या समोर धूप केला नेहमीसारखा… घर धुपाच्या त्या सुगंधाने भरून गेले… काही वेळ गेल्यानंतर धुपाटण्यात राहिली ती रक्षा… आणि नकळतच माझ्या लेखणीतून उतरलेल्या या ओळी…
राख होते शरीराची …
भस्म ते कपाळी…
राख होता …
प्रवास मुक्तीचा…
भस्म सांगे …
अर्थ…
जिवनाचा…
प्रत्येक वस्तूची…गोष्टीची… ही एक जागा असते. कसे आहे ना, अय्यप्पा पुजेच्या वेळी घातलेली पांढरी शुभ्र वस्त्रे ही पायसता आणि मांगल्य दर्शविते पण त्याच पांढरेधोक रंगाची वस्त्रे घालून जेव्हा आपण एखाद्या मयताला जातो तेव्हा मात्र तीच शुभ्रता नैराश्य आणि दुःखाचे प्रतीक होते. एखाद्या सौंदर्यवतीच्या कपाळी रूळलेले केस… हे तिचे सौंदर्य, तर खुलवतेच पण कवी मनाला भुरळ पाडून त्यांच्याकडून अप्रतिम अशा रचना करून घेते पण हेच केस केशवपनानंतर त्या विधवेच्या अगतिकतेचे प्रमाण होते.
तशीच गोवऱ्या जाळून… धुपाटण्यात स्वामींपुढे किंवा इष्ट देवतांपुढे ओवाळून झालेली रक्षा… राख… ही आदराने आणि श्रध्देने आपण ललाटी धारण करतो, पण जेव्हा त्याच गोवऱ्या एखाद्या प्रेताला भडाग्नी देताना वापरतात तेव्हा ती रक्षा घरातही घेतली जात नाही, तर दाराबाहेर ठेवून तिचे नंतर योग्य त्यावेळी वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते.
आता या गोवऱ्यांचेच पहा ना, यांचा फक्त वापर कशा पद्धतीने होतो त्यावर त्यांची उपयुक्तता अथवा निरूपयोगीपण ठरते. मित्रांनो, तसेच आपलेही आयुष्य आहे, गुरफटलेल्या भावना, मनाची गुंतागुंत सोडवण्याची वेळ ही सांजवेळ… कातरवेळ… योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य त्या पध्दतीने त्या भावनांचा गुंता सोडवला, तर बरेचदा आयुष्यात आयुष्याचे बरेचसे पेच सुटतात, पण तेच जर विचारांचे, भावभावनांचे गुंतावळ मनात दाबून ठेवले, तर कधीकधी भविष्यातच नव्हे तर वर्तमानातही आपल्याला कित्येक वादळांचे सामने करावे लागतात. आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा पाठीमागे राहाव्यात साऱ्यांनी त्या वळून वळून पाहाव्यात, समाजाने आपल्याला नावाजावे हे कुणाला आवडत नाही…ॽ त्याकरिता आपण प्रत्येकजण हा प्रयत्नशील असतोच नाही काॽ
पण आपले ते प्रयत्न योग्य त्या पद्धतीने योग्य त्या दिशेने जात असतील तरच त्यांचे सुयोग्य असे फळ आपल्याला मिळते. नाही तर आपल्या त्या अथक परिश्रमाने जर नुकसान झाले तरी ते आपलेच होते. जन्माने एखाद्या जाती वर्णाचा लागलेला टिळा हा खर तर सर्वस्वी माणसाला माणसामाणसातील भेदाभेदात रूतवून ठेवतो. त्यात आपण अडकून राहून आपल्या आयुष्याची माती करायची की, अखंड तपस्येने, ज्ञान उपासनेने, सेवेने या जीवनाची ज्योत समाजाच्या आणि पर्यायाने आपल्या हितासाठी जाळायची की, ज्याच्या तेजाने दशदिशा उजळून जातील हे ठरवणे आपल्याच हातात आहे नाही काॽ असे म्हणतात की, वेगवेगळ्या चौऱ्याअंशी लक्ष योनी जन्म घेतला की, मग मानव जन्म मिळतो. मग समाजाच्या हृदय कोंदणात आपल्या अस्तित्त्वाचे अमृत थेंब हे साऱ्यांनी सुरेल सुरांसारखे, घुंगुरवाळ्यासारखे जपायला नकोत काॽ धर्मांध वैशाख वणव्याच्या रणरणत्या दाहकतेने समाज रचना बदलून पहाणाऱ्यांना, आपल्या राघव सावलीत, प्रेमळ अनवट मायेच्या चंद्रांमृतात नव्या बहरात साऱ्यांच्या आयुष्याचे देवचाफे जोजवले, फुललेले राहू देत, जेणे करून साऱ्यांच्याच आयुष्याच्या फुलबागेत आपल्या पायी कायम प्रेमाची वात्सल्याची गंगा वाहात राहील आणि मग आपल्या मृत्यूनंतर ही आपल्या शरीराची राख ही भस्म बनून साऱ्यांच्याच ललाटी मिरवली जाईल.