मुंबई : परतीच्या पावसाने जाता जाता रौद्र रुप दाखविण्यास सुरुवात केली असून गुरुवारी सांयकाळनंतर मुसळधार पावसाने मुंबई शहर, उपनगर व नवी मुंबईला झोडपून काढले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, उरणच्या काही भागात पाऊस जोरदार पडला आहे.
मुंबईत विविध ठिकाणी सांयकाळी आठनंतर पावसाने सुरुवात केली. तब्बल दीड तास संततधार पाऊस पडल्यानंतर पावसाने रौद्र रुप दाखविण्यास सुरुवात केली. मुंबईतील वीजाचा कडकडाट व ढगांचा गडगडाट पहावयास मिळाला. घरी परतणाऱ्यांचे या पावसामुळे हाल झाले. पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. फेरीवाल्यांनाही आपला धंदा आटोपता घेऊन मिळेल त्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. बससेवेवरही या पावसाचा परिणाम झाल्याने रिक्षा व टॅक्सी या खासगी वाहनांचा मुंबईकरांना आधार घ्यावा लागला. या पावसाने तब्बल तीन ते चार तास झोडल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत.
नवी मुंबईमध्ये वाशी, नेरूळ, सानपाडा, ऐरोली, कोपरखैराणे, बेलापूर, घणसोली भागात रात्री सातनंतर तब्बल तीन ते चार तास सलग पाऊस पडला. मुसळधार पावसासोबत वीजा कडाडत असल्याने नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. नवरात्रीच्या अनेक देवी मंडपामध्ये पाणी घुसल्याने कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. नवरात्रीच्या अखेरच्या दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने गरबाप्रेमींची निराशा झाली असून त्यांना घरी जावे लागले आहे. अंर्तगत रस्त्यावर पाणी तुंबले असल्याने वाहने काढताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली आहे. सानपाडा मार्गे ठाणे बेलापूर रोडकडे जाताना पुलाखाली पाणी साचले होते. शिरवणेतील गणपती मंदिराजवळील पुलाखालीही पाणी तुंबले होते.