पिंपरी-चिंचवड : पुणे (Pune) शहरातील पिंपरी- चिंचवडमधून (Pimpari Chinchwad) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी- चिंचवड शाहू नगर येथील डी.वाय.पाटील शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे. सँडविच खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्या सारख झाल्याने विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहू नगरच्या डी वाय पाटील स्कूल मध्ये आज फूड सेशन आयोजित करण्यात आलं होतं. या फूड शेषन मध्ये पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून सँडविच खाण्यासाठी देण्यात आले. परंतु सँडविच खाताच अनेक विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखं व्हायला लागलं, तर काही विद्यार्थ्यांना भोवळ आली. तातडीने विद्यार्थ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले.
दरम्यान, शाळेकडून हलगर्जीपणा झाला असून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊ घालणाऱ्यावर दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. तसेच या घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे.