Wednesday, April 30, 2025

विशेष लेखसंपादकीय

पेजर्स हल्ला : सावध ऐका पुढच्या हाका

पेजर्स हल्ला : सावध ऐका पुढच्या हाका

राही भिडे

लेबनॉनमध्ये पेजरमध्ये झालेल्या स्फोटांच्या धर्तीवर मोबाईलचाही स्फोट करता येऊ शकतो. मोबाईलमध्येही एक छोटासा स्फोटक बसवता येतो. बॉम्बच्या जगात सी-४ नावाचा स्फोटक असतो, जो फोनच्या बॅटरीमध्ये बसवला जातो. त्यातून स्फोट घडवता येतात. स्फोट वायरलेस सिग्नलद्वारे होतात. ब्लूटूथ किंवा इतर कोणत्याही नेटवर्कद्वारे सिग्नल पाठवले जातात आणि स्फोट होतो. त्यामुळे पुढील काळात सावध राहण्याची गरज आहे.

अलीकडे लेबनॉनमध्ये एकाच वेळी काही हजार पेजर्स आणि डझनभर वॉकी-टॉकीजचा स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण लेबनॉनमध्ये खळबळ उडाली. हे गुप्त ऑपरेशन अतिशय हुशारीने पार पडले. या ऑपरेशनचे नाव होते ऑपरेशन ग्रिम बीपर. हे सर्वोत्कृष्ट ऑपरेशन मानले जाते. दोन दिवसांमध्ये लेबनॉनमध्ये हजारो पेजर्स आणि वॉकीटॉकींच्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला, तर काही हजार लोक जखमी झाले.

हे ऑपरेशन अलीकडील इतिहासातील सर्वात काळजीपूर्वक आणि नियोजित हल्ल्यांपैकी एक आहे. पेजर स्फोटात इस्रायलचा संभाव्य सहभाग, अचूक लक्ष्यीकरण, उच्चस्तरीय समन्वय आणि ऑपरेशनद्वारे साध्य केलेली अनेक उद्दिष्टे स्पष्टपणे दिसत आहेत. इस्रायली हल्ल्यांमुळे हिजबुल्लाला मोठा धक्का बसला आहे. पेजर हे एक प्रकारचे संवाद साधन आहे. मोबाईल फोनच्या युगापूर्वी हे व्हॉइस आणि मजकूर संदेश पाठवण्यासाठी वापरले जायचे. ‘गँग्ज ऑफ वास्सेपूर’ या चित्रपटामधील नवाजुद्दीन सिद्दिकीची व्यक्तिरेखा आठवत असल्यास त्याच्यासोबत असणारे काळ्या रंगाच्या मोबाईलसारखे उपकरण म्हणजे पेजर. पेजरबाबतची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे त्याचा मागोवा घेणे खूप कठीण आहे. आजकाल मोजक्याच लोकांकडे पेजर आढळतो. हिजबुल्लाकडे सर्वात जास्त. हिजबुल्ला ही लेबनॉनची अतिरेकी संघटना आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हवाई हल्ला केला. हिजबुल्लाच्या पुरवठा साखळीचे मॅपिंग आणि अचूक घुसखोरी हिजबुल्लाला लक्ष्य करणारे पेजर स्फोट हे दहशतवादी गटाच्या पुरवठा साखळीतील घुसखोरीचा परिणाम असल्याचे मानले जाते.

पेजरच्या हेराफेरीसाठी एक ग्रॅम अधिकच्या प्रमाणात स्फोटकांची आवश्यकता होती. याला ‘पीईटीएन’ म्हणतात. हजारो उपकरणे मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या भागात वितरीत केली जाणार असल्याने पेजर मोठ्या स्फोटक उपकरणांमध्ये बदलू नयेत, म्हणून एजंटना अत्यंत सतर्क राहावे लागले. हेराफेरीच्या पेजरबाबत कोणीही शंका उपस्थित करू नये, हेही ध्यानात ठेवण्यात आले होते. यासाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणांनी एक छोटी स्फोटक यंत्रणा विकसित केली; जी एका छोट्या पेजरमध्ये लपवली जाऊ शकते. पेजरच्या आत किती ‘पीईटीएन’ ठेवायचे हे ठरवण्यासाठी किती काळजीपूर्वक नियोजन केले गेले होते याची कल्पना करता येते. परिणामी, नियंत्रित स्फोट होतो. स्फोटाची योजना, कट रचणे आणि अमलात आणून इस्रायली गुप्तचर संघटनेने लेबनॉनमध्ये अशा प्रकारे दहशत निर्माण केली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांसाठी पेजरची पहिली तुकडी लेबनॉनला पोहोचल्यानंतर इस्रायली गुप्तचर यंत्रणेला काही महिन्यांसाठी तणावाचा सामना करावा लागला. कारण ब्लास्ट बटण दाबण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहवी लागली. बनावट उपकरणांसह पकडले जाण्याचाही धोका होता. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना फक्त शंभर पेजर्स वितरीत केले गेले असते, तर धोका आणखी कमी झाला असता; परंतु पाच हजारांपेक्षा जास्त पेजर प्रचलित असल्याच्या अहवालामुळे जोखीम मोठ्या प्रमाणात वाढली होती.

पेजरमध्ये स्फोटक असल्याचे उघड होण्याचाही धोका होता. विशेषतः लटाकिया बंदर आणि लेबनॉनच्या सीमेवरून सीरियामध्ये येणाऱ्या सौर पॅनेलच्या शिपमेंटमध्ये हेरगिरी उपकरणे सापडली होती. मे २०२४ मध्ये ‘सीरिया टीव्ही’ने केलेल्या तपासणीनुसार, ही उपकरणे इस्रायलमध्ये सापडली होती आणि सीरियामधील ‘आरजीसी’ आणि इराणच्या ‘प्रॉक्सीं’वर लक्ष ठेवण्याचा हेतू होता. युद्धादरम्यान शत्रूचे संप्रेषण अक्षम करण्यासाठी ऊर्जेचा मोठा भाग खर्च केला जातो. हे एक संपूर्ण ऑपरेशन होते. दोन दिवसांच्या स्फोटांमध्ये दळणवळणाची साधने सामाईक होती. इस्राईलसारख्या लष्करीदृष्ट्या श्रेष्ठ शक्तीच्या विरोधात हिजबुल्लाला प्रभावीपणे उभे राहण्यासाठी, पेजर आणि रेडिओ अक्षम केल्याने त्यांची संप्रेषण क्षमता अपंग झाली आहे. त्यामुळे त्यांचा बचाव करणे खूप कठीण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह याने त्याच्या सैनिकांना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली. त्यानंतर हिजबुल्लाच्या सैनिकांनी आपले मोबाईल फोन बंद केले. कारण इस्रायली गुप्तचर संस्थांनी त्यात घुसखोरी केली होती. मोबाईल फोन, वॉकी-टॉकी आणि पेजर यांसारखी सर्व संप्रेषण उपकरणे प्रभावीपणे अक्षम केल्यामुळे इस्रायली हल्ल्याच्या प्रसंगी हिजबुल्लाह कमकुवत झाला आहे. यानिमित्ताने लेबनॉन आणि सीरियामध्ये हिजबुल्लाहवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला झाला.

पेजर हल्ल्यानंतर हिजबुल्लाकडून समोर आलेले विधान महत्त्वाचेे आहे. त्यात इस्रायलला दोषी ठरवण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो की, पेजर म्हणजे काय आणि ते काम कसे करते. पेजर हे संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी वापरले जाणारे एक उपकरण आहे. १९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या सुरुवातीस फोन युगाच्या आगमनापूर्वी पेजरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. हे विशेषतः डॉक्टर, व्यापारी आणि आपत्कालीन सेवा व्यावसायिकांनी वापरले. कारण ते विश्वसनीय मानले जात होते. पेजर रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरते. एखाद्याला संदेश पाठवायचा असतो, तेव्हा पेजर नेटवर्क संदेश पाठवते, जो पेजर डिव्हाइसला प्राप्त होतो. संदेश आल्यावर तो बीप किंवा कंपन करतो, म्हणूनच त्याला ‘बीपर’ किंवा ‘ब्लीपर’ असेही म्हणतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या इंटरनेट किंवा कॉलिंगची गरज नसते. हे उपकरण डोंगराळ भागात किंवा दुर्गम भागात जास्त फायदेशीर ठरते. मोबाईल फोन नेटवर्क कमकुवत असलेल्या भागातही पेजर हे अतिशय विश्वासार्ह साधन ठरते. पेजर तीन प्रकारांमध्ये आढळते. प्रथम वन वे पेजर येतो. एकेरी पेजरमध्ये केवळ संदेश प्राप्त होऊ शकतात. टू वे पेजरमध्ये मेसेज प्राप्त करण्यासोबतच पाठवायचीही सुविधा असते. तिसऱ्या प्रकारात अर्थात व्हॉइस पेजरमध्ये व्हॉइस मेसेज रेकॉर्ड केले जातात.

मोबाईल फोन वापरात आल्यापासून पेजरचा वापर खूपच कमी झाला. मोबाईल फोन व्हॉईस कॉल, टेक्स्ट मेसेज आणि इंटरनेट ॲक्सेससह विविध वैशिष्ट्यांसह येतात. असे असूनही काही विशेष ठिकाणी अजूनही पेजर वापरले जातात. यामध्ये आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सेवांचा समावेश आहे. त्यांच्या बॅटरी बराच काळ टिकतात. पेजरची सुरक्षा प्रणाली खूपच कमकुवत ठरते. सामान्य हॅकिंग माहीत असलेली व्यक्तीही या डिव्हाइससह खेळू शकते. पेजरद्वारे पाठवले जाणारे संदेश एन्क्रिप्ट केलेले नसतात. या वेळी लेबनॉनमध्ये झालेल्या हल्ल्यातही अशाच पद्धतीने पेजर हॅक करण्यात आल्याचे समजते. मोबाईल फोनचादेखील अशाच प्रकारे स्फोट होऊ शकतो का, याचे उत्तर होय असे आहे. कारण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे विकास होत आहे आणि त्यात सातत्याने बदल होत आहेत, ते पाहता येणाऱ्या काळात काहीही अशक्य होणार नाही. भारतासाठीही तंत्रज्ञानाचा वाढता वापर धोकादायक आहे. कारण अलीकडच्या काळात स्मार्टफोनचा ट्रेंड खूप वाढला आहे. भारतात करोडो लोक स्मार्टफोन विकत घेताना कोणत्या देशात बनवला आहे, याची फारशी तपासणी करत नाहीत. या छोट्या चुका पुढे मोठ्या धोक्याचे रूप धारण करू शकतात. ‘एआय’ अर्थात कृत्रिम प्रज्ञेने या जगात प्रवेश केल्यापासून अशी अनेक कामे क्षणार्धात पूर्ण होऊ लागली आहेत, ज्याचा यापूर्वी कधी विचारही केला गेला नव्हता. ‘एआय व्हॉईस क्लोनिंग’ हे एक असे शस्त्र बनले आहे, ज्याद्वारे लोक मोठे घोटाळे करत आहेत. या प्रकारामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आवाजात बोलते. आगामी काळात देशाच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका मानला जात आहे.

संरक्षणतज्ज्ञांच्या मते, लिथियम ही अत्यंत किरकोळ बॅटरी आहे. लिथियम-आयर्न बॅटरीला आग लागण्याचे सामान्य कारण म्हणजे उच्च तापमानाचा संपर्क. ही बॅटरी विशिष्ट तापमानाच्या मर्यादेत काम करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. जास्त गरम झाल्यास त्या अस्थिर होऊ शकतात. त्यामुळे स्फोटक वायू तयार होतात किंवा आग लागू शकते. सर्वच प्रकारच्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये आता लिथियम बॅटरी आणि सेमीकंडक्टर वापरले जातात. इस्त्रायलने केलेल्या करामती पाहता भावी काळात अशा नॅनो चिप्समध्येही प्रोग्राम लोड करून शत्रुराष्ट्रात इलेक्ट्रानिक्स वस्तूंमध्ये स्फोट घडवला जाण्याची भीती आहे. त्यासाठी यापुढे अशा चिप्स कुठे बनवल्या, त्यांची विश्वासार्हता काय, त्यांच्यात काही प्रोग्राम फीड करून दूरस्थ पद्धतीने ते ऑपरेट करण्याची व्यवस्था आहे का, हे पाहावे लागेल.

Comments
Add Comment