भाजपा खासदार नारायण राणे यांच्याकडून रतन टाटांना श्रध्दांजली अर्पण
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा (Ratan Tata Death) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिग्गज नेते, उद्योजक आणि कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रध्दाजंली वाहिली आहे. भाजपा पक्षाचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे.
नारायण राणे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, देशाच्या नव्हे तर जगाच्या उद्योग क्षेत्रातील ऋषितुल्य व्यकित्मत्व पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनामुळे उद्योग क्षेत्राची व भारतातील सामाजिक जबाबदारीच्या मोहिमेची मोठी हानी झाली. टाटा उद्योग समुहाला जगातील प्रमुख उद्योगांच्या बरोबरीने आणतानाच त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान कायम ठेवले. देशावर आलेल्या संकटाच्या वेळी त्यांनी आपल्या उद्योगाच्या तिजोरीची दारे खुली ठेवली.
त्याचपुढे, नेतृत्व २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी दिसून आले. राखरांगोळी झालेले टाटाचे मुंबईच्या प्रवेशद्वारावरील ताज हॉटेल त्यांनी अल्पावधीतच पूर्वीच्या दिमाखात सुरु केले. एवढे मोठे आर्थिक साम्राज्य हाताशी असताना वैयक्तिक मानमरातबासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला नाही. गोरगरीब व भटक्या प्राण्यांसाठीचा त्यांचा कनवाळूपणा जगजाहीर होता. महाराष्ट्राचा उद्योगमंत्री असताना औद्योगिक धोरणाच्या बैठकांमध्ये उद्योगांप्रती त्यांची तळमळ, बांधिलकी व दूरदृष्टी जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली.
या महान व्यक्तिमत्वाला मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करतो व त्यांच्या जाण्याचे दु:ख सहन करण्यासाठी परमेश्वराने टाटा कुटुंबियांना बळ द्यावे अशी मनोभावे प्रार्थना करतो, असे नारायण राणे यांनी लिहले आहे.