ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषारत्नाकर रावराणे
अर्जुना, इंद्रिये आणि विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो, आणि ती घाबरून आपली आई, जे मन त्याच्या पोटात शिरतात.’
‘इंद्रियां विषयांचिया गांठी।
आपैसया सुटती किरीटी।
मन मायेच्या पोटीं। रिगती दाही ॥
अध्याय १८ ओवी क्र ७३८
‘आपैसया’ शब्दाचा अर्थ आहे आपोआप. अतिशय बोलकी अशी ही ओवी! अर्थात ज्ञानदेवांची. कुठे येते ही? कोणत्या संदर्भात? अठराव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट करून सांगतात की, सात्त्विक, राजसिक आणि तामसिक हे तीन भेद होत. या तीन बुद्धीनुसार घडत असते माणसाची वागणूक. या वागणुकीच्या मुळाशी असतं ‘धैर्य’. म्हणून धैर्याचेही तीन भेद होतात. यांपैकी सात्त्विक धैर्याचं वर्णन करताना आली आहे वरील ओवी !
विचार स्पष्ट करण्यासाठी साजेशा दाखल्यांची मालिका द्यायची ही ज्ञानदेवांची प्रभावी अशी कथनपद्धती आहे. त्यानुसार इथेही ते सुंदर दृष्टान्तमाला देतात. काय सांगण्यासाठी? ‘सात्त्विक धैर्य उत्पन्न झाले असता, मन, प्राण आणि इंद्रिय यांचे व्यापार जागचे जागी बंद होतात.’ हे सांगताना आलेले सुरस दाखले असे की, ‘सूर्योदय होताच जसा चौर्यकर्मासह अंधार नाहीसा होतो, किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो.’ ओवी क्र. ७३३
‘किंवा वारा एकसारखा झपाट्याने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनांसह नाहीसे होतात.’ ओवी क्र. ७३४
‘अथवा अगस्ती ऋषींच्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात, किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्यविकासी कमले आपोआप मिटतात.’ ओवी क्र. ७३५
सूर्य, राजा, सपाट्याने वाहणारा वारा, अगस्ती ऋषी आणि चंद्र हे दाखले दिले आहेत. ‘सात्त्विक धैर्य’ स्पष्ट करण्यासाठी. किती सूचक, नेमके आहेत हे! सूर्याच्या ठिकाणी सर्व जगाला प्रकाशित करण्याची शक्ती असते, तर राजा म्हणजे सत्ताधीश, साऱ्या जगावर त्याची सत्ता चालते. अफाट वेगाने वाहणारा वारा, अत्यंत सामर्थ्यवान अगस्ती ऋषी (ज्यांनी देवांवरील अत्याचार दूर करण्यासाठी संपूर्ण समुद्र पिऊन टाकला अशी पुराणकथा आहे…) आणि तेजस्वी; परंतु शीतल असा चंद्र! हे सारे गुणविशेष सात्त्विक धैर्याच्या ठिकाणी असतात. याचा परिणाम भोवतालावर काय होतो हेही यात वर्णन करून सांगितले आहे. यातून ज्ञानदेव ‘सात्त्विक धैर्या’ची ताकद साकारतात श्रोत्यांसमोर. पुढे येणारा दाखला – ‘इंद्रिये व विषय यांचा स्नेह सुटून ती आपली आई मन, त्याच्या पोटात शिरतात.’ किती सहजतेने माऊली अरूपाला रूप देतात! इंद्रिय आणि विषय यांची एरवी मैत्री असते. इंद्रियांना विविध गोष्टी विषय दाखवत असतात, जसे की, खाण्याच्या, पिण्याच्या, पाहण्याच्या आणि बऱ्याच काही. इंद्रिये तिथे धाव घेत असतात. हा नेहमीचा अनुभव आहे, पण इथे त्यांचा स्नेह सुटतो.
इंद्रियांची आई मन ही माऊलींची कल्पना किती आगळी आणि अर्थपूर्ण आहे! एखादं मूल घाबरतं, ते आईच्या कुशीत शिरतं. हा आपल्या परिचयाचा प्रसंग. त्याचा वापर करून ज्ञानदेव इंद्रियं आणि विषय यांना मूर्त रूप देतात. इतकंच नव्हे, तर ‘मना’सारख्या न दिसणाऱ्या गोष्टीला मुठीत पकडतात. त्यातून आपल्या नजरेसमोर सारं चित्र साकारतात. ‘सात्त्विक धैर्या’सारखा कठीण वाटणारा विषय अगदी सोपा करतात. भक्तिमार्गाची वाट सामान्यांसाठी सहज करतात. माऊलींच्या या कार्याला लागू होणाऱ्या तुकारामांच्या अभंगातील ओळी आठवतात –
तुका म्हणे सोपी केली पायवाट।
उतरावया भवसागर रे।
manisharaorane196@ gmail.com