मुंबई- प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर राज्यात आज (गुरुवारी) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबतच आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.
या शोकप्रस्तावात म्हंटल आहे की, समाज उभारणीचा प्रभावी मार्ग उद्यमशीलता हा देखील असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक रतन टाटा यांच्या रुपाने गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाज उभारणीच्या कामातही श्री. टाटा यांचे योगदान अपूर्व होते. महाराष्ट्राचे ते सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वच्छ कारभार, स्वयंशिस्त, आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत श्री. टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही अप्रतिम ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे.
टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे रतन टाटा हे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष त्यांनी पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली.