मुंबई : राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार राज्यातील रेरा नोंदणीकृत तब्बल ३१४ गृहप्रकल्पांविरोधात नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. विविध बँका, वित्तीय संस्था आदींनी राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत या ३१४ प्रकल्पांविरोधात नादारी आणि दिवाळखोरीची कारवाई सुरू केली आहे. यापैकी सर्वाधिक, २३६ प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील आहेत.
या सर्व प्रकल्पांची यादी महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. हे प्रकल्प केव्हाही दिवाळीखोरीत जाऊ शकतात. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये घर खरेदी केलेल्यांनी वा घर खरेदी करणाऱ्यांनी ही यादी तपासूनच योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन यानिमित्ताने महारेराकडून करण्यात आले आहे.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेराकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. राष्ट्रीय विधी न्यायाधिकारणाकडून महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांविरोधात सुरू असलेल्या नादारी आणि दिवाळखोरीच्या कारवाईची याची तपासणी केली जाते. त्यानुसार यापूर्वीही दिवाळीखोरीची टांगती तलावर असलेल्या प्रकल्पांची यादी महारेराने प्रसिद्ध केली होती. आता पुन्हा महारेराच्या पाहणीत राज्यातील ३१४ गृहप्रकल्प नादारी आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे निदर्शास आले आहे.
वित्तीय संस्था, बँका, वित्त पुरवठा करणाऱ्या इतर संस्थांनी या प्रकल्पांविरोधात राष्ट्रीय विधी न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. त्यानुसार या प्रकल्पांविरोधात नादारी आणि दिवाळीखोरीची कारवाई सुरू आहे. कोणत्याही क्षणी हे प्रकल्प दिवाळखोर म्हणून घोषित होऊ शकतात. परिणामी, या प्रकल्पांतील घरे विकत घेणारे ग्राहक अडचणीत येण्याची शक्यता आहे.