हरियाणात भाजपाने क्लिनिकल विजय मिळवला आणि त्याच्याबद्दल अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेसने सेट केलेला चुकीचा नरेटिव्ह या निवडणुकीत काँग्रेसला तारू शकला नाही. विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस लोकांच्या भावनांची नाडी अचूक ओळखू शकली नाही हे एक कारण होते. जय किसान, जय पहिलवान अशा घोषणा निवडणूक प्रचारात चांगल्या वाटतात. पण प्रत्यक्षात त्यांचा निवडणूक जिंकून देण्यात काहीही फायदा होत नसतो हे आता काँग्रेसला कळले असेल. एक्झिट पोल्सनी काँग्रेसला ५० च्या आसपास जागा दिल्या होत्या, प्रत्यक्षात त्या भाजपाला मिळत आहेत. त्यावरून एक्झिट पोल्सवर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहेच. पण किसान आणि पहिलवान यांच्यावर राहुल गांधी जास्त विश्वासून राहिले ही गोष्ट त्यांच्याविरोधात गेली. हरियाणा हे दिल्लीच्या सीमेवरील राज्य. त्यामुळे दिल्लीकडे जाणारे रस्ते हे हरियाणातूनच जातात.
गेल्या वेळेस शेतकऱ्यांचे आंदोलन झाले तेव्हा शेतकरी फाईव्ह स्टार हॉटेलचे जेवण घेऊन तेथे मुक्कामाला होते ही बाब लोकांच्या लक्षात आहे. शेतकरी नेता राकेश टिकाईत यांच्यासह अनेक नेत्यांनी कसे आपल्या बाजेवर बसून केंद्र सरकारला नाचवले होते ते आजही साऱ्यांना माहीत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी त्या आंदोलनाला हवा दिली होती आणि आज ते भाजपामध्ये आहेत. राहुल गांधी यांनी तेव्हाही अमरिंदर यांना कसलेही महत्त्व दिले नव्हते. इतकेच नव्हे तर ते राज्यात त्यांच्या प्रचारासाठी आलेही नाहीत. काँग्रेसने शेतकऱ्यांना पेटवले आणि त्यांच्या आंदोलनाच्या जोरावर आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न केला हे सत्य आहे. तेव्हा शेतकरी होते आणि आता पहिलवानांना काँग्रेसने पेटवले आणि भाजपाविरोधात त्यांचा वापर केला. पहिलवानांना त्यासाठी भाजपाविरोधात आवाज उठवण्यासाठी उकसवले आणि त्यात आघाडीवर होते भाजपाचे नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात टीका करण्यासाठी महिला ऑलिम्पियन कुस्तीपटू. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि भाजपा या राज्यात पूर्वीपेक्षा जास्त जागा घेऊन विजयी झाला आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना मोदी सरकारने दिलेल्या कथित वागणुकीबद्दल मतदार संताप व्यक्त करतील, अशी आशा सर्वांना होती. पण मतदारांनी भाजपावर आपला विश्वास व्यक्त केला आणि लैंगिक छळाचा महिला कुस्तीपटूंनी केलेला आरोप तद्दन खोटा होता यावर मतदारांनी विश्वास ठेवला. त्यामुळे पहिलवानांचे हे धोरण सपशेल फसले आणि त्यांचा डाव त्यांच्याच अंगलट आला. काँग्रेसने यावर खूप आगपाखड केली आणि पहिलवान कसे बरोबर होते याची अनेक उदाहरणे सादर केली. पण काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला मतदार राजा बळी पडला नाही आणि निवडणुकीत काँग्रेसचा पूर्वीपेक्षाही वाईट पराभव झाला. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या प्रचाराला मोठी गर्दी जमत असे. पण तिचे रूपांतर मतांमध्ये करण्यात काँग्रेसला अपयश आले. हरियाणात काँग्रेसचा २०१४ नंतर सलग तिसऱ्यांदा पराभव झाला आहे.
राहुल गांधी हे पुन्हा अपयशी ठरले आहेत. कारण त्यांचा पाया चुकीचा आहे. फेक नरेटिव्ह आणि दलित आणि इतर घटकांची उपेक्षा हे त्यांच्या स्वभावातील दोष यामुळे त्यांचा सातत्याने पराभव होत आहे. सर्वच एक्झिट पोल्सनी काँग्रेसला ५५ ते ६० जागा दिल्या होत्या. प्रत्यक्षात त्यांना ३७ येत आहेत. याचा अर्थ केवळ फेक नरेटिव्हवर अवलंबून राहता येत नाही हा धडा राहुल शिकले तरीही पुष्कळ झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पहिलवानांचा मुद्दा. हा मुद्दा काँग्रेसने खूप ताणून धरला आणि त्यावर नको तितके अवलंबून राहिल्याने काँग्रेसचा तोटा झाला असे म्हणावे लागेल. पहिलवान हे देशाची शान आहेत. पण त्यांच्याबाबतीत काही मर्यादा आहेत. पैलवान यांना काँग्रेसने आकर्षून घेतले आणि त्यांना प्रचंड महत्त्व दिले. लैंगिक छळाच्या तक्रारी खऱ्या असतील असे समजून पहिलवानांच्या तक्रारीवरून मोदी सरकारला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. पण तसे काहीही नव्हते. पण निकाल अगदी उलट लागले आहेत आणि पहिलवानांचा फॅक्टर यशस्वी झालेला दिसला नाही. उलट काँग्रेस त्यावर नको तितका अवलंबून राहिला त्याचा फटका काँग्रेसला तर बसलाच पण त्याच्या मित्रपक्षांनाही बसण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे. जय किसान जय पहिलवान ही घोषणा मात्र हरियाणात अपयशी ठरली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक्झिट पोल्सचा. एक्झिट पोल्सनी काँग्रेसला यश तर निश्चित दिले होते आणि प्रत्येक एक्झिट पोलने काँग्रेसला हरियाणात ५५च्या आसपास जागा दिल्या होत्या. कालही मतमोजणी सुरू असतानाही काँग्रेसचे कार्यकर्ते हवेत होते आणि जिलेबीचे सेवनही सुरू झाले होते.पण दुपारी जशी मतमोजणी जोरात सुरू झाली तेव्हा काँग्रेसचे कार्यकर्ते हळूहळू एकेक काढता पाय घेऊ लागले आणि नंतर तर गायबच झाले. काँग्रेसच्या आतापर्यंत निवडणुका याच पद्धतीने जिंकल्या की काय अशी शंका येते.
पहिलवानांचा मुद्दा असो की, नोकऱ्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, या सर्व मुद्द्यांवर काँग्रेसने आतापर्यंत निवडणुका केवळ फेक नरेटिव्हचा आधार घेऊन जिंकल्या असे स्पष्ट होते. पहिलवानांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या महिला कुस्तीपटू या चांगल्याच तोडघशी पडल्या आहेत. काँग्रेसचा हा फेक नरेटिव्ह आता तर चांगलाच फेल गेला आहे. पण भविष्यात काँग्रेस असे काही करणार नाही याची काहीही हमी नाही. मतदारांना खूप सावध राहावे लागेल. पहिलवान हे राज्यातील व्यवस्था बदलू शकतात पण ते जर योग्य बाजूने असतील तर. केवळ एका पक्षाच्या बाजूने ते प्रचारात उतरले तर त्यांचे असेच होणार आहे हा धडा यानिमित्ताने मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. काँग्रेसचा हा फेक नरेटिव्ह होता आणि तो पहिलवानांच्या मदतीने काँग्रेसने हाती घेतला होता. पण तो यशस्वी झाला नाही. कारण त्याचा हेतूच शुद्ध नव्हता. केवळ मोदी सरकारला हरवणे हा पहिलवानांचा हेतू होता आणि त्याला मतदारांनी साफ धुडकावले हाच याचा अर्थ आहे.