
मुंबई : शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. पालिका आणि जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांचा यामध्ये समावेश आहे. चर्नी मार्ग येथील नियोजित मराठी भाषा भवन याठिकाणी मुख्य सोहळा पार पडणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विविध सन्माननीय खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांनाही या सोहळ्यास निमंत्रित करण्यात आले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी हे अध्यक्षस्थानी असतील.
प्रस्तावित लोकार्पण, शुभारंभ व भूमिपूजन होणाऱ्या कामांमध्ये पालिका अंतर्गत मुंबादेवी परिसर, महालक्ष्मी परिसर आणि बाबूलनाथ परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन; अँटॉप हिल येथील जगन्नाथ शंकरशेट स्मारकाचे भूमिपूजन; छत्रपती शिवाजी महाराज मैदान (दादर) येथील भागोजी शेठ कीर स्मारकाचे भूमिपूजन; जे.जे.उड्डाणपुलाखाली हो-हो बेस्ट बसेसमध्ये तयार करण्यात आलेले कलादालन व वाचनालयाचे लोकार्पण, ‘ए’ विभागातील बुधवार पार्क येथील फूड प्लाझाचा शुभारंभ, ‘ए’ ते ‘डी’ विभागातील ‘पिंक टॉयलेट’चे लोकार्पण, मुंबई शहरामध्ये १४ ठिकाणी कॉफी शॉपसह आकांक्षी स्वच्छतागृहांचा शुभारंभ आणि ७ ठिकाणी भूमिपूजन, मुंबई शहरातील दलित वस्तींमध्ये १० ठिकाणी वाचनालय व अभ्यासिका उपक्रमाचा शुभारंभ, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी सोयीसुविधा उपक्रमाचा शुभारंभ तसेच फॅशन स्ट्रीटच्या कायापालट कामाचा शुभारंभ व भूमिपूजन यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
तसेच, पालिकेच्या १०३ शाळांमधील टेरेस किचन गार्डनचे लोकार्पण आणि मुंबई शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे. याचसोबत, माहीम कोळीवाडा येथील समुद्र किनाऱ्यालगत विहारक्षेत्र (प्रॉमेनेड) व संरक्षक भिंत सुशोभीकरण तसेच अरुणकुमार वैद्य मार्गालगत पदपथ (माहीम ट्रॅफिक चौकी ते वांद्रे उदंचन केंद्रापर्यंत) सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन देखील यावेळी करण्यात येणार आहे.