पुणे : पुणे (Pune) गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे म्हणजे म्हाडा पुणे मंडळाच्या (Mhada Pune Mandal) सहा हजार २९४ घरांच्या सोडतीसाठीच्या (Mhada Lottery) अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे . पुणे, पिंपरी – चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील घरांचा या सोडतीत समावेश आहे. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आज अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेचा सुरुवात करण्यात आली. आता अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया, सोडतपूर्व प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर म्हणजे ५ डिसेंबर रोजी या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
पुणे मंडळाची ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली असून यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत २,३४० सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील ४१८ सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३,३१२ सदनिकांचा समावेश आहे तसेच १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील १३१ सदनिकांचा समावेश आहे.