आमदार नितेश राणे यांचे खुले आव्हान
मुंबई : संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) काल रात्री मारलेल्या ९०चा परिणाम अजूनही उतरला नाही, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होतं. काल हरियाणामध्ये भाजपाचं (BJP) दाबून पराभव होतोय, असं घसा सुखेपर्यंत ओरडून बोलणाऱ्याला हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील एकही जागा जिंकता आली नाही, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला. तसेच संजय राऊतच्या मालक म्हणजे उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) बोचरी टीका करत स्वत:च्या ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवा, असे खुले आव्हान दिले आहे.
हरियाणा राज्यामध्ये भाजपाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. तर जम्मू काश्मीरमध्येही सर्वात जास्त वोट शेअर म्हणजे २९.१६ टक्के हा भाजपा पक्षाचा आहे. याबद्दलचं दु:ख संजय राजाराम राऊतच्या चेहऱ्यावर आज सकाळी पत्रकार परिषदेत दिसून येत होतं. ज्या दहा जनपथला काँग्रेस पक्षाची मम्मी बसते त्यांना साधं हरियाणा जिंकता आलं नाही. तसेच जम्मू काश्मीरमध्येही केवळ सहा सीट मिळाल्या म्हणून आज सामनातील अग्रलेखासह पत्रकार परिषदेतून संजय राजाराम राऊत काँग्रेसला मोठे डोळे वटारुन दाखवत होता. त्यामुळे संजय राजाराम राऊतने त्याच्या आणि मालकामध्ये हिंमत आणि लायकी असेल तर मविआमधून बाहेर येवून स्वत:च्या जोरावर, जीवावर, ताकदीवर महाराष्ट्राची निवडणूक लढवून दाखवा, असे खुले आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.
उबाठाची तुलना भाजपा सोबत करण्याची लायकी नाही
हरियाणामध्ये स्वत:च्या ताकदीवर भाजपा पक्ष सत्तेवर आला आहे. तसेच जम्मू काश्मीरच्या सर्व हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपा पक्षाला मतदान केलं. महायुती हा निवडणुका स्वत:च्या हिंमतीवर जिंकतो. महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन जिंकत नाही. त्यामुळे उबाठाची तुलना भाजपासोबत करण्याची तुमची लायकी नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी विरोधकांना लगावला.
त्याचबरोबर संजय राजाराम राऊतने त्याची आणि त्याच्या मालकाने ढुंगणात ताकद असेल तर यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला महाराष्ट्रातील २८८ जागा स्वत:च्या ताकदीवर लढणार हे जाहीर करावे. उगाच फुशारक्या मारुन दुसऱ्यांना सल्ले देण्याचं काम बंद करावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले.
उबाठा आणि काँग्रेस मनोरंजनाचं साधन
काँग्रेसने उबाठाला आणि उबाठाने काँग्रेसला सल्ले देणं म्हणजे वर्गातले दोन ‘ढ’ विद्यार्थी एक दुसऱ्याला मार्गदर्शन करतात असंच समज आहे. कारण लोकसभेमध्ये उबाठा आणि हरियाणा व जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस नापास झालेला आहे. हे दोन्ही ‘ढ’ विद्यार्थी आपापसात भांडून स्वत:चेच कपडे फाडतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यांना केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहते, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.