मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) परिसरात २९ वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मुंबईतील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील वांद्रे (Bandra Crime) निर्मलनगर परिसरात एका १८ वर्षीय तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचा केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पीडित तरुणीला मदत करण्याचा हेतु साधत तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन नराधमांनी तरुणीला घरी सोडतो असे म्हटल्यानंतर पीडीत तरूणी तरुणांसोबत गेली. त्यानंतर तरुणांनी पीडित तरुणीला पिण्यासाठी पाणी दिले. मात्र नराधमांनी पिण्याच्या पाण्यात गुंगीच औषध मिसळले होते. ते पाणी पिल्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली. नराधमांनी बेशुद्ध अवस्थेत त्या तरुणीला अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केलं.
आरोपींकडून तरुणीला जीवे मारण्याची धमकी
पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात आलं. यावेळी आरोपींनी तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. घरी सोडल्यानंतर तरूणीने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली. यामध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचा पोलीस कडक तपास घेत आहेत.