हैदराबादमध्ये भारताविरुद्ध शेवटचा सामना खेळणार
दिल्ली : बांगलादेशचा माजी कर्णधार शकिब अल हसननंतर आता फलंदाज महमुदुल्लाहनेही टी-२० फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यासह तो सर्वात लहान फॉर्मेटला अलविदा करेल. हा सामना १२ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणार आहे.
३८ वर्षीय महमुदुल्लाहने २०२१मध्येच कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. तो वनडे खेळणे सुरू ठेवणार आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा प्लेयर होता. त्याचे लक्ष्य आता चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. त्याआधी बांगलादेशचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वनडे मालिकाही खेळणार आहे. महमुदुल्लाहने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पत्रकार परिषदेत निवृत्ती जाहीर केली. महमुदुल्लाहने श्रीलंकेविरुद्ध १८ चेंडूत ४३ धावा करून बांगलादेशला अंतिम फेरीत नेले. महमुदुल्लाहने बांगलादेशकडून १३९ टी-२० सामन्यात २३९५ धावा केल्या आणि ४० विकेट घेतल्या. महमुदुल्लाहने २००७ मध्ये केनियाविरुद्ध टी-२० पदार्पण केले, त्याची कारकीर्द १७ वर्षे ३५ दिवस चालली. शाकिब अल हसन आणि झिम्बाब्वेच्या शॉन विल्यम्सनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची कारकीर्द सर्वात मोठी होती.
मी माझ्या निवृत्तीचा आधीच विचार केला होता. भारतात येण्यापूर्वीही मी कर्णधार आणि प्रशिक्षकाशी याबाबत बोललो होतो. या दोघांशी चर्चा केल्यानंतर मी बीसीबी अध्यक्षांना माझ्या निर्णयाची माहिती दिली. मला वाटते की टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, मी आता पूर्णपणे वनडेवर लक्ष केंद्रित करेन.