Thursday, January 16, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखहरियाणात पुन्हा मोदींचीच जादू

हरियाणात पुन्हा मोदींचीच जादू

लोकसभा निवडणुकीत भाजपाला देशातील मतदारांनी सर्वात जास्त जागा दिल्या. भाजपाला बहुमत मिळाले नाही, पण २४० जागा जिंकलेल्या भाजपाची केंद्रात सत्ता स्थापन झाली. भाजपाप्रणीत एनडीएकडे लोकसभेत बहुमत असल्याने नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन केली. लोकसभा निवडणुकीत भाजपाने अबकी बार ४०० पार अशी घोषणा दिली होती, पण मतदारांनी भाजपाला नाकारले, असा प्रचार काँग्रेस व इंडियामधील राजकीय पक्षांनी केला. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा व जम्मू – काश्मीर या दोन राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुका ही भाजपाच्या दृष्टीने परीक्षाच होती. हरियाणात सलग दहा वर्षे भाजपाची सत्ता आहे, म्हणून काहीही करून सत्ता कायम ठेवणे हे भाजपापुढे मोठे आव्हान होते. काँग्रेसने तर भाजपाच्या विरोधात हरियाणात रान पेटविण्याचा प्रयत्न केला.

हरियाणात आता भाजपाचा पराभव शंभर टक्के होणार आणि काँग्रेसची सत्ता येणार असा फाजिल आत्मविश्वास काँग्रेसला दिसून आला. प्रत्यक्षात जमिनीवरचे चित्र वेगळे होते, हरियाणातील बिगर जाट आणि जाट मतदारांनीही भाजपाला मतदान केले, त्यामुळेच विधानसभेच्या ९० जागांपैकी ५० जागांवर भाजपाचे कमळ फुललेले दिसले. हरियाणाची निवडणूक ही भाजपाच्या दृष्टीने मोठी कसोटी होती. सन २०१४ मध्ये मोदी लाट असताना या राज्यातून सर्वच्या सर्व दहा खासदार भाजपाचे निवडून आले होते, यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हरियाणातून भाजपाचे केवळ पाचच खासदार विजयी झाले. त्यामुळे हरियाणातील जनतेला बदल पहिजे आहे असा काँग्रेसने प्रचार केला. भाजपाला सत्तेवरून हटवून मतदार काँग्रेसला मतदान करतील असे काँग्रेसने गृहीत धरले होते. हरियाणा काँग्रेसची सारी सूत्रे भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याकडे एकवटली होती. तिकीट वाटपापासून सारे निर्णय भूपिंदरसिंह हुड्डा सांगतील तसेच होत राहिले. माजी मंत्री शैलजा या काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांना मानणारा हरियाणात मोठा वर्ग आहे. आपणाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे.अशी त्यांनी जाहीरपणे इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांचे का व कोणी तिकीट कापले हे त्यांनाही सांगता आले नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असतो असे सांगून त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्याचे टाळले. याचा अर्थ हुड्डा कंपनीने हरियाणामध्ये तिकीट वाटपासून ते प्रचाराची आखणी करण्यापर्यंत सर्वत्र मनमानी केली असावी, इतर कोणालाही विश्वासात न घेता हुड्डा यांनी निवडणूक काळात मेरी मर्जी असे धोरण राबवले व त्याचा फटका पक्षाला बसला हे आता उघड होते आहे. मतदान झाल्यावर हरियाणा व जम्मू-काश्मीरचे एक्झिट पोल सर्व टीव्ही चॅनेलच्या पडद्यावरून झळकले. सर्वच एक्झिट पोलमध्ये हरियाणात भाजपाचा पराभव होणार व काँग्रेस सत्तेवर येणार तसेच जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस युतीचे सरकार येणार असे भाकीत केले होते. जम्मू-काश्मीरचा अंदाज वास्तवात उतरला असला तरी हरियाणात मात्र एक्झिट पोलचे अंदाज साफ चुकले असेच दिसून आले. भाजपाची रणनिती व निवडणूक व्यवस्थापन हे खूप सूक्ष्म पातळीवर होते. बूथ कार्यकर्ता व पन्ना प्रमुख यांच्याकडे कामाचे वाटप अचूक होते, बिगर जाट मतांबरोबरच जाट मतेही कशी आपल्याला मिळतील यासाठी पक्षाने प्रयत्न केले. किसान, जवान व पहिलवान यांचा भाजपावर रोष आहे, त्याचा फटका या निवडणुकीत भाजपाला बसणार तसचे दहा वर्षे सत्तेवर असलेल्या भाजपाला अँटी इन्कबन्सीचा परिणाम भोगावा लागणार हे काँग्रेसने गृहीत धरले होते.

शेतकरी आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर कसे अडविण्यात आले व आंदोलकांना कशी क्रूर वागणूक देण्यात आली, दिल्लीत लैंगिक शोषणाचा निषेध करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पदके मिळविणाऱ्या महिला कुस्तीपटूंची केंद्रातील भाजपा सरकारने कशी उपेक्षा केली आणि अग्निवीर योजनेतून तरुण मुलांची कशी फसवणूक केली या मुद्द्यावरच काँग्रेसने निवडणूक लढवली. काँग्रेसचा प्रचार हा सर्व नकारात्मक होता तर भाजपाचा प्रचार हा सकारात्मक होता. ‘सबका साथ सबका विकास’ हेच भाजपाने प्रचाराचे सूत्र ठेवले होते. काँग्रेसचा प्रचार हा जातीच्या व्होट बँकेवर अवलंबून होता, तर भाजपाने सर्व जातींना विकासाचा अजेंडा दाखवून मते मागितली होती. हरियाणाच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळणार नाही पण काही अपक्षांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात विधानसभेत बहुमतासाठी ४६ हा जादुई आकडा असताना भाजपाला त्याहीपेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. भाजपाने यापूर्वी राज्याला बिगर जाट मुख्यमंत्री देऊन जाट समाजाचा अवमान केला असाही प्रचार काँग्रेसने केला होता, पण त्याचा काहीही परिणाम भाजपाला मिळालेल्या मतांवर झाला नाही हे निवडणूक निकालाने दाखवून दिले. दिल्लीच्या राजकारणात काँग्रेस आणि आप (आम आदमी पक्ष) यांचा साप-शिडीसारखा खेळ चालू असतो. आपने हरियाणात काँग्रेसशी युती करण्याची तयारी दर्शवली होती. काँग्रेसकडे आपने केवळ ९ जागांची मागणी केली होती. पण काँग्रेसने एकही जागा आपला सोडण्यास नकार दिला. या निवडणुकीत आपने ८९ जागा लढवल्या. सर्व उमेदवार पराभूत झाले. तिहार जेल रिटर्न अरविंद केजरीवाल यांचे कार्ड हरियाणात चालले नाही. फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक आहे. केजरीवाल यांना हरियाणाने धोक्याचा इशारा दिला आहे. हरियाणात भाजपाने हॅटट्रीक केली व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाट या काँग्रेसच्या तिकिटावर चांगल्या मतांनी निवडून आल्या याचीच चर्चा सर्वत्र चालू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -