मुंबईतील कॉलेज विद्यार्थ्यांच्या ‘गरबा पास स्कॅम’चा पर्दाफाश
मुंबई : देशभरात नवरात्री उत्सवाची धूम सुरू असून विविध ठिकाणी गरबा-दांडिया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्सवात बाहेरील लोकांपासून सुरक्षा राखण्यासाठी प्रवेश तिकीट किंवा पासेसद्वारे दिला जातो. मात्र, मुंबईतील काही कॉलेज विद्यार्थ्यांनी याचाच गैरफायदा घेत ‘गरबा पास स्कॅम’ (Garba Pass Scam) रचल्याचे समोर आले आहे.
मुंबईच्या बोरिवली परिसरात रायगड प्रतिष्ठान आयोजित ‘रंग रास गरबा’ कार्यक्रमासाठी ६०० बनावट सीझन पास तयार करून विकण्याच्या आरोपात सहा विद्यार्थ्यांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी, वय १८ ते २० वर्षे आहे. हे सर्वजण कॉलेज विद्यार्थी असून त्यात मनोज वेशी चावडा (१९), अंश हितेश नागर (२०), भव्य जितेंद्र मकवाना (१९), राज शैलेश मकवाना (१९), यश राजू मेहता (१९) आणि केयूर जगदीश नाई (२०) यांचा समावेश आहे.
या टोळीने नवरात्री काळात कमी दिवसांत मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने ६०० बनावट गरबा पास तयार केले. त्यांची एकूण किंमत अंदाजे ६ लाख रुपये होती.
मुंबईत कॉलेज विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘गरबा पास’ स्कॅममधून, ६०० बनावट पासेस विकून लाखोंची कमाई करणार होते. मात्र सोमवारी (७ ऑक्टोबर) संध्याकाळी, दोन तरुणांनी हे पास वापरून गरबामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी चेकिंग दरम्यान पासवरील बारकोड स्कॅन न झाल्याने सुरक्षारक्षकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी चौकशीदरम्यान या टोळीचा भांडाफोड केला व बनावट पास बनवण्याचे साहित्य जप्त केले. आरोपींनी आणखी किती पासेस तयार केले आहेत, किती जणांना विकले आहेत आणि या स्कॅममध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.