भाईंदर : पहिल्या पतीपासुन झालेल्या मुलाचा विचार न करता त्याला अनाथ आश्रमात टाकून पहिला नवऱ्याच्या निधनानंतर दुसरे लग्न करून संसार थाटलेल्या आईचा विरह सहन न झाल्याने तणावग्रस्त अवस्थेत असलेल्या आठ वर्षीय मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना भाईंदर येथे घडली आहे.
पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न करून पहिल्या पतीपासुन झालेल्या आठ वर्षीय मुलाला भाईंदर येथिल केअरींग हँड्स सेवा कुटीर या संस्थेत ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यातच मुलाची आई त्याला भेटायला आली होती. तेव्हा त्याने मला येथे राहायचे नाही तू मला घेऊन चल असा तगादा लावला होता. संस्थेच्या लोकांना सुध्दा तो असेच सांगत असे. परंतू आईने असमर्थता दाखवली होती. त्यामुळे मुलाला प्रचंड नैराश्य आले होते.
मंगळवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर त्याने आश्रमातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सकाळी जेव्हा संस्थेचे कर्मचारी व मुले उठली तेव्हा एक मुलगा कमी असल्याने शोधाशोध सुरू झाली आणि सदर प्रकार उघडकीस आला.
संस्थेने उत्तन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठविला असता शवविच्छेदन अहवालात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुलाच्या आईला संपर्क करून माहिती देऊन सायंकाळी मृतदेह आईकडे सोपवण्यात आला.