महायुती सरकारचा दिवाळीपूर्वीच २ कोटी ३० लाख बहीणींना दिलासा
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे दिल्याची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेतून २ कोटी ३० लाख माझ्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा ३००० रुपयांचा हप्ता जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काही लोक म्हणत होते की, आचार संहितेपूर्वी या योजना बंद पाडू. आमची देण्याची वृत्ती आहे, आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे राहणारे सरकार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात एका क्लिकवर जमा केले आहेत. आमचे सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे, हफ्ते घेणारे सरकार नाही असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. विरोधकांची तोंड आता काळी झाली आहेत. आशाताई भोसले यांनी देखील विरोधकांना चांगली चपराक दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. खोडा घालणारे कुणीही येउद्या ही लाडकी बहीण योजना सुरुच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बहिणींच्या खात्यात १७ हजार कोटी जमा
अनेक योजना यशस्वी राबवण्याची सरकारने जबाबदारी घेतली आहे. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते रायगडमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. २ कोटी ३० लाख बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास १७००० कोटी रुपयांचे वितरण सरकारने लाडक्या बहिणींना केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमची देण्याची वृत्ती आहे. ही योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार अॅडव्हान्समध्ये देणारे सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेमुळे विरोधकांची तोंडे काळी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
योजनेत खोडा न घालण्याचे सावत्र भावांना आवाहन
या योजनेच्या पैशातून अनेक लाडक्या बहिणांनी कुटुंबासाठी औषधे खरेदी केले, काही घरात लागणाऱ्या वस्तू देखील खरेदी केल्या आहे. अनेक बहिणींनी मला देखील चिठ्ठ्या पाठवल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून बहिणांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. लाडकी बहीण योजनेत खोडा घालू नका, असे माझे दुष्ट सावत्र भावांना सांगणे आहे. गरिबांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावू नका असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.