Tuesday, July 1, 2025

रायगडमध्ये लाडक्या बहिणींची बस २० फूट खोल दरीत कोसळली; जीवितहानी टळली

रायगडमध्ये लाडक्या बहिणींची बस २० फूट खोल दरीत कोसळली; जीवितहानी टळली

श्रीवर्धन : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या भव्य कार्यक्रमासाठी राज्यभरातून महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सोहळ्यासाठी येणाऱ्या काही महिलांची बस श्रीवर्धन तालुक्यातील मांजरोने घाटात २० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु काही महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


हा अपघात मुख्य वळणावर घडला, ज्यात चालकाचा तांत्रिक अनुभव कमी असल्याने नियंत्रण सुटल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.


सुमारे १० एकर क्षेत्रात आयोजित या सोहळ्यासाठी धनसे क्रीडांगणावर ५० हजार आसन व्यवस्थेसह जय्यत तयारी करण्यात आली होती. विशेषत: लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून महिलांना आणण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरक्षा आणि सोयीसाठी ५०० पोलिस कर्मचारी तैनात होते.


'माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ऑगस्टपासून विविध हप्त्यांद्वारे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात एकूण ७५०० रुपये मिळाले आहेत. महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे, कारण दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित या सोहळ्यात मुख्यमंत्री त्यांना भाऊबीज भेट देणार आहेत.


हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या महिला कल्याण आणि आर्थिक सहाय्य उपक्रमाचा भाग आहे, त्यामध्ये महिलांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने निधी वाटप करण्यात येत आहे.

Comments
Add Comment