मुंबई : मुंबईत मागील काही दिवसांपासून उकाडा वाढल्याने मुंबईकर हैराण झाले, असतानाच बुधवारी परतीच्या पावसाच्या सरीने मुंबईकर चिंब झाले. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने घामाघूम झालेले मुंबईकर सुखावले. मुंबईत रविवार पर्यंत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई आणि परिसरात बुधवारी दुपारनंतर आकाश ढगाळ होत मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कमाल तापमान सुमारे अडीच अंश सेल्सिअसने कमी होत गारवा निर्माण झाल्याने प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.
मुंबईत कुलाबा येथे सायंकाळपर्यंत ०.४ मिमी पाऊस नोंदला गेला. सांताक्रुझ येथे तुरळक सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा- ३० अंश, तर सांताक्रुझ- ३०.६ अंश नोंदले गेले. त्यात २.६ अंशाची घट झाली आहे. किमान तापमान कुलाबा-२५.९ तर सांताक्रुझ २६.३ अंश सेल्सिअस होते. त्यातील घट १.४ अंशापर्यंत होती.