ड्रायव्हरला आज वांद्रे न्यायालयात हजर करणार
मुंबई : वांद्रे येथील भरधाव बेस्ट बस अपघातात बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहावीत शिकणारा अरबाज अन्सारी शाळेतून घरी जात असताना भरधाव वेगाने जाणा-या बेस्ट बसने त्याला उडवले. याप्रकरणी बेस्ट बस ड्रायव्हर विजय बागल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक देखील करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अटक आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान अशाप्रकारे भरधाव वेगाने अपघात झाल्यानंतर मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे.
वांद्रे (पूर्व) भागात मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सहावीत शिकणारा मोहम्मद त्यावेळी वांद्रे वसाहत भागातील कार्डिनल ग्रेशिअस शाळेतून नेहमीप्रमाणे मित्रांसोबत वाल्मिकी नगर येथील घरी परत येत होता. खेरवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो आपल्या मित्रांसह रस्ता ओलांडत असताना बसने उजव्या बाजूने त्याला धडक दिली.
५९९ क्रमांकाची बेस्ट बस वांद्रे रेक्लेमेशन येथील वांद्रे डेपोतून टाटा कॉलनी (वांद्रे) येथे जात असताना हा अपघात झाला.
अपघाताच्या घटनेनंतर बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले, तर विजय बागलसह बसला पोलीस ठाण्यात आणण्यात आले, असे एका पोलिस अधिका-याने सांगितले.
विद्यार्थ्याच्या वडिलांना एका व्यक्तीने फोन करुन घटनेची माहिती दिली. शाळेच्या ओळखपत्रावर मोहम्मदचा संपर्क क्रमांक सापडल्यानंतर त्याने वडिलांना फोन केला आणि तुमच्या मुलाचा अपघात झाल्याचे सांगितले.
बस कंडक्टरने तात्काळ मोहम्मदला रिक्षातून व्ही एन देसाई रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान दुपारी १२.१५ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.
अपघाताचे साक्षीदार असलेल्या स्थानिक आणि वाटसरूंनी सांगितले की, मोहम्मद आणि त्याचे मित्र रस्ता ओलांडत असताना वेगवान बेस्ट बसने त्याला धडक दिली. बसचे चाक त्याच्या कंबरेवरुन गेले, असे एका पोलीस अधिका-याने सांगितले.
पोलिसांनी मुलाचे वडील शकील अहमद अन्सारी (४२) यांचा जबाब नोंदवला. ते कपड्याच्या दुकानात शिंपी म्हणून काम करतात. शकील यांनी पोलिसांना सांगितले की, मी कामाच्या ठिकाणी होतो, तेव्हा मला अपघाताची माहिती देण्यासाठी एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने माझ्या मुलाच्या शाळेच्या ओळखपत्रावरून माझा नंबर मिळवला होता.
दरम्यान, बेस्टच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, बुधवारी बस चालकाला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बस कंडक्टरने मुलाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि अपघातानंतर त्याला रुग्णालयात नेले. परंतु दुर्दैवाने, त्याला रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. या घटनेबाबत चालकाची चौकशी केली जात आहे.