मुंबई : कुर्ला (पश्चिम), एलबीएस मार्ग, सम्राट हायस्कूल येथे झोपडपट्टी भागात असलेल्या गोदामात भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ज्वलनशील वस्तूंमुळे ही आग अवघ्या एका तासात भडकली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.
कुर्ला ( पश्चिम), गुरू गोविंद सिंग नगर, सम्राट हायस्कूल, मधुबन टोयोटो सर्व्हिस सेंटरजवळ असलेल्या एका गोदामाला बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आग लागली. सदर परिसरात काही रहिवाशी झोपड्या, गोदामे, लहान कारखाने असल्याने आणि त्यामध्ये ज्वलनशील वस्तू, पदार्थ असल्याने आग अवघ्या १५ मिनिटात म्हणजे भडकली. सायंकाळी ५.५८ वाजता अग्निशमन दलाने आग भडकल्या सदर आग स्तर-२ ची झाल्याचे आणि ३० मिनिटात आग आणखीन भडकल्याने सदर आग स्तर-३ ची झाल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले.
या आगीत काही झोपड्या, प्लास्टिक सामानाचे गोदाम, रॅपर बनविण्याचा कारखाना, छोटे कारखाने आदी जळून खाक झाले. या आगीची भीषणता पाहता सदर परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य तातडीने सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ६ फायर इंजिन,६ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आग विझविण्याचा प्रयत्न केले.
या आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाल्याचे वृत हाती आलेले नाही. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच स्थानिक आमदार दिलीप लांडे (मामा) यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या ठिकाणी बचावकार्य मदत आणि युद्धपातळीवर करण्यासाठी महापालिका,अग्निशमन दलाकडे सतत पाठवराव केला. मात्र रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.